मुंब्य्रात थरार! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार, पोलिसांच्या चकमकीनंतर सराईत गुन्हेगार जेरबंद; हल्लेखोराकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:54 IST2026-03-07T15:54:21+5:302026-03-07T15:54:57+5:30
दोन स्थानिक रहिवासी जखमी; हल्लेखोराकडून दोन पिस्तूलसह व जिवंत काडतुसे जप्त

मुंब्य्रात थरार! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार, पोलिसांच्या चकमकीनंतर सराईत गुन्हेगार जेरबंद; हल्लेखोराकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्त
ठाणे/मुंब्रा : मुंब्रा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि युट्युबर नदीम खान उर्फ बाबा खान यांच्या घरावर आणि वाहनावर शनिवारी पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास एका टोळीने गोळीबार केला. या घटनेनंतर आरोपीचा थरारक पाठलाग करणाºया पोलीस पथकावरही हल्लेखोराने दोन रिव्हॉल्व्हरमधून बेछूट गोळीबार केला. मात्र, जीवाची पर्वा न करता मुंब्रा पोलिसांनी सराईत गुन्हेगार शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (२८) याला फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. या धुमश्चक्रीत दोन स्थानिक नागरिक गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंब्रा भागात पोलिसांची जादा कुमक तैनात केली आहे.
*पहाटेचा थरार आणि पोलिसांचा पाठलाग
कौसा येथील अरमान को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे नदीम यांच्या घराबाहेर शनिवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराचा आवाज झाला. हल्लेखोरांनी खान यांच्या कारवर दोन आणि हवेत एक अशा एकूण तीन गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच बीट मार्शल आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तेजस सावंत, सोनवणे यांच्यासह पथक घटनेची माहिती मिळताच अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले.
चौकशीमध्ये हल्लेखोर आचार गल्लीतील एका भंगार गोदामात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले असता, त्याने दोन्ही हातात पिस्तूल घेऊन पोलिसांच्या दिशेने सिनेस्टाईलने गोळीबार करण्यास सुरुवात केली.
*दोघे जखमी, ८ वर्षांचा 'तिहार'चा प्रवास-
पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर हल्लेखोराने जमावाच्या दिशेनेही गोळीबार केला. यामध्ये एका स्थानिकाच्या पोटात, तर दुसºयाच्या हाताला गोळी लागून ते जखमी झाले. जखमींना तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सावंत, पोलीस हवालदार तडवी आणि अंमलदार महाडीक यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून हल्लेखोराला जमिनीवर पाडले आणि त्याच्याकडील दोन पिस्तूल, चार मॅगझिनसह जिवंत काडतुसे जप्त केली. हल्लेखोर सराईत गुन्हेगार शहाबाद असल्याची माहिती चौकशीत समोर आली. त्याने दिल्लीतील तिहार कारागृहात आठ वर्षे शिक्षा भोगली आहे. त्याच्यावर दिल्लीतील जाफ्राबाद पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सावंत, सोनावणे व त्यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली. सध्या मुंब्य्रातील या भागात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून शहाबादच्या फरार साथीदाराचाही शोध घेण्यात येत आहे. या गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.