खिल्लारेच्या हत्येत आणखी तिघांचा समावेश, तिघेही कऱ्हाड येथील; पोलिसांकडून ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 07:34 IST2023-02-06T07:33:38+5:302023-02-06T07:34:29+5:30
खिल्लारे यांच्या खून प्रकरणात आणखी काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी तपासाची सुत्रे फिरविण्यास सुरवात केली होती.

खिल्लारेच्या हत्येत आणखी तिघांचा समावेश, तिघेही कऱ्हाड येथील; पोलिसांकडून ताब्यात
सावंतवाडी- आर्थिक देवघेवीतून आंबोली घाटात घडलेल्या सुशांत खिल्लारे याच्या खून प्रकरणात कऱ्हाड येथील आणखी तिघांचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले आहे. यानंतर, तिघांनाही सावंतवाडीपोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. पार्टीच्या वेळी आपल्याकडून झालेल्या मारहाणीत त्याचा खून झाला, अशी कबूली त्यांनी पोलिसांसमोर दिली. मात्र मृतदेह घाटात टाकताना हे तिघे नव्हते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
अभय पाटील ( 35),प्रविण बळीराम (25) व राहून माने (23) अशी या तिघांची नावे आहेत. त्यांना रविवारी अटक करण्यात आली आहे, अशी माहीती सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी सोळंके यांनी दिली.
खिल्लारे यांच्या खून प्रकरणात आणखी काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी तपासाची सुत्रे फिरविण्यास सुरवात केली होती. दरम्यान त्यांनी दोन दिवस केलेल्या तपासात अटकेत असलेल्या तुषार पवार याच्याकडून हा सर्व प्रकार उघड झाला होता. त्याने दिलेल्या माहीतीनुसार आपण आर्थिक देवघेवीतून कामगार पुरवणारा मुकादम असलेल्या खिल्लारे याचे अपहरण केले. त्यानंतर कराड येथिल एका निर्जन ठीकाणी आपण सर्व पार्टी करण्यासाठी बसलो यावेळी त्याला सर्वानी मारहाण केली आणी त्यातच त्याचा मृत्यू झाला. यावेळी आणखी तिघे भाउसो माने यांच्यासह आपण मिळून आणखी चौघे होतो असे त्याने सांगितले. त्याने दिलेल्या माहीतीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सोळंके यांच्यासह त्याचे सहकारी पोलिस उपनिरिक्षक सुरज पाटील,काका करंगुटकर,सचिन कोयंडे,अमित राउळ,गजानन देसाई,अभिजीत कांबळे आदीचे पथक काल कराड येथे गेले आणि तिघांना ताब्यात घेतले.
याबाबत उपविभागीय अधिकारी सोळंके म्हणाल्या या प्रकरणात संशयित पवार याची कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर काही गोपनिय व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील चौकशी करण्यात आली. यात काही सिसिटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यानंतर, या प्रकरणात या तिघांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे. चौकशी दरम्यान त्यांनी आपण हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. उद्या त्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.