पोलीस निरीक्षक अनुज कश्यप यांचा भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नंतर समोर आले. अनुज यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जिच्यासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध सुरू होते, त्या पोलीस उपनिरीक्षक स्वीटीला व्हिडीओ कॉल केला आणि कॉल सुरू असतानाच गळफास घेतला. या प्रकरणात पोलिसांनी स्वीटीला अटक केली, त्यानंतर आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अनुज कश्यप हे गया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या मीडिया सेलचे प्रभारी होते. रात्री पोलिसांच्या कारवाईची निवेदन प्रसिद्ध करून ते घरी गेले आणि सकाळी त्यांच्या मृत्यूचे निवेदन पोलिसांना द्यावे लागले.
लग्नाआधीच स्वीटीसोबत प्रेमसंबंध, नंतर...
अनुज कश्यप विवाहित होते. त्यांची पत्नी दिल्लीमध्ये युपीएससीची तयारी करते. अनुज आणि स्वीटी यांची भेट प्रशिक्षण काळातच झाली होती. त्यांच्या संबंधाबद्दल पोलीस विभागात माहिती होते. त्यामुळे नियुक्ती करताना दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग दिली गेली.
अनुज यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात तर स्वीटी कुमारीची बेलागंज पोलीस ठाण्यात नियुक्ती केली गेली. याच काळात अनुज यांचं लग्न झालं. त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आला. दोन वर्षापूर्वी लग्न झालेल्या अनुज यांची पत्नी युपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेली आणि अनुज भाड्याने फ्लॅट करून राहू लागले. त्यानंतर स्वीटी आणि अनुज जवळ आले.
स्वीटी अनुजला घरी येऊन भेटायची. दोघे सोबत जेवायला जायचे. त्यामुळे अनुजचे स्वीटीसोबतचे विवाहबाह्य संबंध पुन्हा सुरू झाले.
आत्महत्या का केली?
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक असलेल्या स्वीटी कुमारीने अनुज यांच्याकडे लग्न करण्याची मागणी सुरू केली. पत्नीला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर, असा तगादा तिने लावला होता. याच कारणावरुन ती अनुज यांना मानसिक त्रास देऊ लागली.
८ ऑगस्ट रोजी स्वीटी कुमारी आणि अनुज कश्यप यांच्यात व्हिडीओ कॉलवरून संवाद सुरू होता. पण, मध्येच वाद सुरू झाला आणि तो विकोपाला गेला. व्हिडीओ कॉल सुरू असतानाच अनुज कश्यप यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
अनुज यांच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्वीटी कुमारीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात अटक केली. लग्नाचा तगादा लावला होता, त्यामुळे अनुज यांनी आत्महत्या केल्याचे स्वीटीने कबुली दिली आहे.