धर्मांतरण प्रकरणाचे धागेदोरे; उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकाचा नागपुरात छापा; तीन जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 17:32 IST2021-07-17T17:31:32+5:302021-07-17T17:32:23+5:30
ATS : गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्या छोट्याछोट्या गरजा पूर्ण करून त्यांचे पद्धतशिर धर्मांतरण करून घेण्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये सुरू होता.

धर्मांतरण प्रकरणाचे धागेदोरे; उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकाचा नागपुरात छापा; तीन जण ताब्यात
नागपूर: गोरगरिबांना आमिष दाखवून धर्मांतरण करणाऱ्या रॅकेटमधील तिघांना उत्तरप्रदेश एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) शुक्रवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. कौसर आलम शौकत अली खान, प्रसाद रामेश्वर कांबळे आणि भूप्रियबंदो देवीदास मानकर, अशी या तिघांची नावे आहेत. ते गणेशपेठ परिसरात लपूनछपून वावरत होते. कांबळे हा मुळचा नागपुरातील रहिवासी आहे. कौसर धनबाद, लोहिचारा (झारखंड) येथील तर भूप्रियबंदो हा चामोर्शी (जि. गडचिरोली) येथील रहिवासी आहे.
गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्या छोट्याछोट्या गरजा पूर्ण करून त्यांचे पद्धतशिर धर्मांतरण करून घेण्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये सुरू होता. एक मोठे रॅकेट हे काम करत होते. गोमतीनगर पोलीस ठाण्यात धर्मांतरविरोधी कायद्याचा गुन्हा दाखल करून यूपी एटीएसने या रॅकेटचा भंडाफोड केला. रॅकेटमधील काहींना अटकही केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून या रॅकेटमधील काही जण नागपुरात लपून असल्याचे यूपी एटीएसला कळले होते. त्यामुळे एटीएसच्या पथकाने शुक्रवारी नागपूर गाठले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन त्यांनी कारवाईसाठी मदत मागितली.
यानंतर शुक्रवारी मध्यरात्री एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहुल कॉम्प्लेक्समध्ये छापा टाकला. येथे २०२ क्रमांकाच्या सदनिकेत लपून असलेल्या कौसर आलम, प्रसाद कांबळे आणि भूप्रियबंदोला जेरबंद केले. त्यांच्याकडून काही महत्वाची कागदपत्रे आणि काही वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.
कारवाईबाबत गोपनियता -
या कारवाईबाबत कमालीची गोपनियता बाळगण्यात आली होती. शनिवारी दुपारी ही कारवाई चर्चेला आल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत दुपारपर्यंत फारसे बोलण्यास टाळले होते.