बिस्कीट पुडे देऊन हजारोंना घातला गंडा; वृद्धेला भेटवस्तूच्या आमिषाने लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 21:52 IST2021-07-23T21:44:21+5:302021-07-23T21:52:48+5:30
Crime News : दोन्ही इसम निघून गेल्याने त्यांनी बॅग पहिली असता त्यात दागिने आणि पर्स नव्हती.

बिस्कीट पुडे देऊन हजारोंना घातला गंडा; वृद्धेला भेटवस्तूच्या आमिषाने लुबाडले
मीरारोड - एका वृद्धेस भेटवस्तूचे आमिष दाखवून दागिने व रोख असा ४१ हजारांना दोघं भामट्याने ठकवले. भेटवस्तू म्हणून बिस्किटाचे पुडे दिले .
जयश्री जयराम पुरळकर ( ७० ) रा. रोहिणी सोसायटी, नवघर - फाटक मार्ग , भाईंदर पुर्व ह्या बुधवारी दुपारी नात हर्षेदा हिच्या बॅगची चैन खराब झाल्याने ती दुरुस्त करून घरी जात होत्या. अचानक एक इसम आला म्हणाला, एकाला मुलगा झाल्याने तो गरिबांना वस्तू व कपडे वाटत असल्याचे सांगून अंगावरील दागिने , पर्स हि सोबतच्या बॅग मध्ये ठेववण्यास सांगितले. भेटवस्तूची पिशवी तुमच्या बॅगेत ठेवतो म्हणून दुसऱ्या इसमाने पुरळकर यांची बॅग घेऊन हातचलाखीने ४० हजार किमतीच्या सोन्याच्या बांगड्या , चैन व ७०० रुपये रोख असा ऐवज लबाडीने लुटून नेला.
दोन्ही इसम निघून गेल्याने त्यांनी बॅग पहिली असता त्यात दागिने आणि पर्स नव्हती. तसेच भेटवस्तू म्हणून दिलेली पिशवी पहिली असता त्यात बिस्किटचे पुडे निघाले. या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.