एकाच व्यक्तीचे हजारावर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 05:54 AM2022-01-28T05:54:52+5:302022-01-28T05:56:52+5:30

ॲण्डरसनच्या मृत्यूनंतर तब्बल १२ वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये एका माजी विद्यार्थ्यांनं ॲण्डरसनविरुद्ध विद्यापीठाकडे लैंगिक शोषणाची तक्रार केली. त्यानंतर अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी पुढे आल्या आणि त्यांनीही विद्यापीठाकडे तक्रार केली.

Thousands of sexual assaults by a single person, misiogun university | एकाच व्यक्तीचे हजारावर लैंगिक अत्याचार

एकाच व्यक्तीचे हजारावर लैंगिक अत्याचार

Next

एखाद्या व्यक्तीनं किती जणांचं लैंगिक शोषण करावं किंवा किती जणांची त्याविषयी तक्रार असावी? लैंगिक शोषणाच्या घटना जगभरात सगळीकडेच घडत असतात. कोणताच देश त्याला अपवाद नाही. पुराव्याअभावी किंवा तक्रारीअभावी हे शोषक सहीसलामत सुटतात ही आणखी एक वेगळी गोष्ट.
मिशिगन युनिव्हर्सिटीमधील एक घटना मात्र काही बाबतीत अतिशय वेगळी आहे. या विद्यापीठात शिकवत असणारे प्रो. डॉ. रॉबर्ट ॲण्डरसन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होते.  केवळ तरुणींनीच नाही तर तरुणांनीही याबाबत तक्रार केली होती. यातली आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळपास तीस वर्षांपेक्षाही अधिक काळ हे प्राध्यापक महाशय विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करीत होते.  आपली कारकिर्द संपून ते निवृत्तही झाले, एवढंच काय, २००८ मध्ये त्यांचा मृत्यूही झाला, पण जिवंत असेपर्यंत त्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाबद्दल एकानंही तक्रार केली नाही.
ॲण्डरसनच्या मृत्यूनंतर तब्बल १२ वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये एका माजी विद्यार्थ्यांनं ॲण्डरसनविरुद्ध विद्यापीठाकडे लैंगिक शोषणाची तक्रार केली. त्यानंतर अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी पुढे आल्या आणि त्यांनीही विद्यापीठाकडे तक्रार केली.

किती जणांनी ॲण्डरसनविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार करावी? तब्बल १०५० मुलं-मुली त्यासाठी पुढे आले. लोकांनीही त्यांना साथ दिली. विद्यार्थी, समाजाचा हा रेटा वाढतच गेला, विद्यापीठासमोर आंदोलनं सुरू झाली, त्यानंतर विद्यापीठानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यासाठी एक समितीही नेमली. ॲण्डरसननी तब्बल चार दशकं विद्यापीठात काम केलं, त्या काळात त्यांनी केलेले लैंगिक अत्याचार उघडकीस येऊ शकले नाहीत. कारण तक्रार करायलाच कोणी पुढे आलं नाही. ॲण्डरसनविरुद्धच्या तक्रारी समोर आल्यानंतर समितीनं कसून चौकशी केली आणि त्यांना विद्यार्थ्यांच्या आरोपात तथ्य आढळून आलं. या प्रकरणात ॲण्डरसन दोषी आहेत, हे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केलं.

ॲण्डरसन आता मृत झाले असले, तरी विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या अन्यायावरची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अत्याचार झालेल्या विद्यार्थ्यांना तब्बल ४९० मिलिअन डॉलर्सची (सुमारे ३६०० कोटी रुपये) नुकसानभरपाई दिली जाणार आहे. अत्याचारग्रस्तांची मागणी अधिक रकमेची होती, पण या रकमेवर शेवटी ‘तडजोड’ करण्यात आली. यातील ४६० मिलियन डॉलर्सची रक्कम त्या अत्याचारग्रस्तांना दिली जाणार आहे, तर भविष्यात पुन्हा अशी काही घटना घडलीच, तर त्यासाठीची तरतूद म्हणून ३० मिलियन डॉलर्सची रक्कम विद्यापीठाच्या राखीव निधीमध्ये वर्ग केली जाणार आहे.
अर्थातच ४६० मिलियन डॉलर्स भरपाईतील किती रक्कम कोणाला मिळेल हे अजून निश्चत नाही. सगळ्यांना सारखीच रक्कम मिळेल असंही नाही. कोणावर किती, कसा अत्याचार झाला, त्यानुसार ही रक्कम ठरवली जाणार आहे. त्याची वर्गवारी कशी करायची हेदेखील एक मोठं आव्हान आहे. त्यासाठी एका त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.

यासंदर्भातल्या अभ्यास गटाचं म्हणणं आहे, ॲण्डरसन यांनी १९६६ ते २००३ इतका दीर्घकाळ विद्यापीठात काम केलं. या ३७ वर्षांच्या काळात असे अनेक प्रसंग आले, संधी मिळाल्या, ज्यावेळी ॲण्डरसनच्या कारवायांवर चाप बसवता येऊ शकला असता, पण विद्यापीठ प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळेच ॲण्डरसन यांची हिंमत वाढत गेली आणि विद्यापीठावर आज नामुष्कीची वेळ आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्षे मिशिगन विद्यापीठ अमेरिकेतल्या सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक म्हणून गणले जात आहे. याप्रकरणी अनेक विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तर काहींनी एकत्रितपणे तक्रार केली होती. १०५० तक्रारदारांपैकी तब्बल २५० जणांचं वकीलपत्र घेतलेल्या ॲटर्नी मिक ग्रेवाल यांनी यासंदर्भात म्हटलं आहे, उशिरा का होईना, अत्याचारग्रस्तांना न्याय मिळतो आहे. अर्थातच या अत्याचारांची भरपाई कशानंही होऊ शकत नाही. टॅड डेलुका यानं मिशिगन ॲथलेटिक संचालक वार्डे म्यॅन्युअल यांना सर्वप्रथम पत्र पाठवलं होतं. ॲण्डरसन यांच्या अत्याचाराचा पाढा त्यानं त्याच्या पत्रात वाचला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ॲण्डरसनविरुद्ध वादळ उठलं.

साधं खरचटलं, तरीही तपासण्या!
ॲण्डरसनविरुद्ध अनेक माजी विद्यार्थिनींनी आरोप केले की, साधा थंडी-ताप आला तरीही ज्याची काहीही गरज नाही, अशा चाचण्या ॲण्डरसन करायला लावत  असत. अगदी साधं खरचटलं, तरीही ते पेल्विक एक्झामिनेशन करत. यात महिलांच्या पुनरुत्पादक अवयवांची चाचणी घेतली जाते. ॲण्डरसन प्रकरणात मिशिगन विद्यापीठाला आता मोठी आर्थिक भरपाई द्यावी लागेल, त्यांची जी काही बदनामी व्हायची, ती झाली, पण अशी प्रकरणं नवी नाहीत. यापूर्वीही लैंगिक छळाच्या प्रकरणात अनेक विद्यापीठांना मोठी रक्कम मोजावी लागली आहे. त्यात पेन स्टेट युनिव्हर्सिटी, ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी.. इत्यादी विद्यापीठांचाही समावेश आहे.

Web Title: Thousands of sexual assaults by a single person, misiogun university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.