ऐकावं ते नवलंच! चोरांनी बोगदा खोदला अन् रेल्वेचं अख्ख इंजिन चोरुन नेलं; बिहारमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 16:05 IST2022-11-25T16:05:23+5:302022-11-25T16:05:49+5:30
Bihar News: मुजफ्फरपूरच्या एका भंगाराच्या गोदामात इंजिनचे पार्ट्स आढळल्यानंतर चोरीचा खुलासा झाला.

ऐकावं ते नवलंच! चोरांनी बोगदा खोदला अन् रेल्वेचं अख्ख इंजिन चोरुन नेलं; बिहारमधील घटना
मुझफ्फरपूर: तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. पण, बिहारमध्ये चोरीच्या एका घटनेने सर्वांनाच चकीत केले आहे. चोरट्यांनी रोहतास येथे 500 टन वजनाचा लोखंडी पूल चोरल्यानंतर आता आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. चोरट्यांनी आता चक्क रेल्वे इंजिन गायब केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूरमधील एका भंगाराच्या दुकानातून जप्त केलेली बॅग रेल्वे इंजिनच्या पार्ट्सने भरलेली होती.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, गेल्या आठवड्यात बरौनी (बेगूसराय जिल्हा) येथील गरहारा यार्डमध्ये दुरुस्तीसाठी आलेले ट्रेनचे डिझेल इंजिन एका टोळीने चोरीन नेले. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल असता, सुरुवातीला तीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुजफ्फरपूरच्या प्रभात कॉलोनीमधील एका भंगाराच्या गोदामातून इंजिनच्या पार्ट्सनी भरलेले 13 बॅग आढळल्या.
चोरीसाठी बोगदा खंदला
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही चोरी घटवून आणण्यासाठी चोरट्यांनी चक्क एक बोगदा तयार केला. या बोगद्यातून चोर यायचे आणि इंजिनचे पार्ट्स चोरुन न्यायचे. या बोगद्यामुळे पोलिसांना किंवा यार्डमध्ये उपस्थित लोकांना चोरीचा पत्ता लागला नाही. आता याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पूर्णियामध्येही अशीच चोरी
पूर्णिया जिल्ह्याही अशाच प्रकारची चोरी झाली होती. चोरट्यांनी एक विंटेज मीटर गेज स्टीम इंजिन चोरुन विकले. हे इंजिन प्रदर्शनासाठी स्थानिक रेल्वे स्टेशनवर ठेवण्यात आले होते. तपासात समोर आले की, एका रेल्वे इंजिनिअरने समस्तीपूर डिव्हिजनच्या डिव्हिजनल मॅकेनिकल इंजीनिअरच्या बनावट पत्राच्या आधारे इंजिन विकले होते.