IIM Kolkata Rape Case: कोलकाता येथील लॉ कॉलेज परिसरातील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाताच्या जोका कॅम्पसमधील मुलांच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात परमानंद जैन नावाच्या संस्थेच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे, विद्यार्थिनीच्या वडिलांनी धक्कादायक दावा केला आहे.
कोलकाताच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या कथित बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पीडितेच्या वडिलांनी दावा केला आहे की त्यांच्या मुलीवर बलात्कार झाला नाही तर ती ऑटो रिक्षातून पडून जखमी झाली. शनिवारी पत्रकारांशी बोलताना पीडितेच्या वडिलांनी सांगितले की त्यांना शुक्रवारी रात्री ९:३४ वाजता फोन आला. त्यांना सांगण्यात आले की त्यांची मुलगी ऑटोमधून पडली आणि बेशुद्ध झाली. त्यांना सांगण्यात आले की मुलीला एसएसकेएम रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले आहे.
"माझ्या मुलीने मला सांगितले की तिच्यावर बलात्कार झाला नाही. पोलिसांनी मला सांगितले की त्यांनी कोणातरीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक केली आहे. माझ्या मुलीने मला सांगितले की पोलिसांनी वैद्यकीय तपासणीदरम्यान मला काहीतरी बोलण्यासाठी दबाव आणला. माझ्या मुलीने काहीही सांगितले नाही," असं पीडितेच्या वडिलांनी सांगितले.
"मी माझ्या मुलीशी बोललो. तिने सांगितले की कोणीही तिच्यावर अत्याचार केलेला नाही. माझी मुलगी आता नीट आहे. माझ्या मुलीचा अटक केलेल्या व्यक्तीशी काहीही संबंध नाही. मी माझ्या मुलीशी बराच वेळ बोलू शकलो नाही. ती सध्या झोपली आहे. ती उठल्यानंतर मी तिच्याशी पुन्हा बोलेन. पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलीला तक्रारीत काहीतरी लिहिण्यास सांगण्यात आले होते," असेही मुलीचे वडील म्हणाले.
विद्यार्थिनीने हरिदेवपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. वसतिगृहात समुपदेशनादरम्यान तिच्या पेयात औषधे मिसळण्यात आली . त्यानंतर बलात्कार करण्यात आला असं तक्रारीत म्हटलं होतं. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अलीपूर न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.