बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:57 IST2025-09-25T08:56:30+5:302025-09-25T08:57:37+5:30
रक्षाबंधनाला बहीण भावाच्या हातावर राखी बांधून आपल्या रक्षणाचं वचन घेते. भाऊ देखील बहिणीच्या संरक्षणासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतो. मात्र....

AI Generated Image
रक्षाबंधनाला बहीण भावाच्या हातावर राखी बांधून आपल्या रक्षणाचं वचन घेते. भाऊ देखील बहिणीच्या संरक्षणासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतो. मात्र उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी घटना समोर आली आहे. इथे दोन सख्ख्या भावांनीच आपल्या सख्या बहिणीवर अनेकदा बलात्कार केला. या संतापजनक कृत्याबद्दल पीडित तरुणीने आई-वडिलांकडे तक्रार केली असता त्यांनीही मुलांचीच बाजू घेतली. मात्र, पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला साथ दिली आणि दोन्ही नराधम भावांना पोलिसांच्या हवाली केले.
नेमकी घटना काय?
हरदोईमधील अरवल परिसरात एका शेतकऱ्याला पाच मुलं आणि दोन मुली आहेत. त्यापैकी २० वर्षांच्या सर्वात लहान मुलीचं लग्न कन्नौजमध्ये ठरलं होतं. लग्नाआधी ती रोज तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी फोनवर बोलायची. एका दिवशी बोलता बोलता तिने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती त्याला दिली. हे ऐकून तिच्या होणाऱ्या नवऱ्याला धक्काच बसला. त्याने तात्काळ तिला पोलीस ठाण्यात नेले. तिथे तिने दोन्ही भावांविरुद्ध तक्रार दाखल केली.
आई-वडिलांनीही साथ दिली नाही...
पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, "माझ्या दोन भावांनी, ज्यापैकी एक अविवाहित आहे आणि दुसरा विवाहित आहे, माझ्यावर अनेकदा बलात्कार केला. मी विरोध केला तर ते मला मारायचे. मी आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली, पण त्यांनी दोन्ही भावांना फक्त ओरडून विषय शांत केला. त्यांनी माझ्यावर अत्याचार करणं सुरूच ठेवलं. अखेरीस मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सगळं सांगितलं. आई-वडिलांनी साथ दिली नसली तरी त्याने मला साथ दिली. त्याच्या म्हणण्यानुसार मी महिला हेल्पलाइन नंबरवरही तक्रार केली."
होणाऱ्या नवऱ्याने केली मदत
पीडितेच्या तक्रारीनंतर अरवल पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना मंगळवारी अटक केली. दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले. पीडितेने दोन्ही भावांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.
पालकांच्या भूमिकेचीही चौकशी
या घटनेची माहिती हरदोईचे एसपी अशोक कुमार मीणा यांनी दिली. ते म्हणाले, "बलात्काराच्या आरोपाखाली दोन्ही सख्ख्या भावांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणातील पीडितेच्या आई-वडिलांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात येणार आहे. जर ते दोषी आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल."