गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकले; आई-मुलावर चाकूने सपासप वार केले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:14 IST2026-03-03T16:13:57+5:302026-03-03T16:14:16+5:30
हल्ल्याचे सत्र सुरूच, आरोपीला मंगळवारी पहाटे उचलले...

गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकले; आई-मुलावर चाकूने सपासप वार केले!
लातूर : दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या व्यक्तीला हटकल्याच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या आईवर चाकूने सपासप वार केल्याची घटना १ मार्च रोजी रात्री १० वाजता महादेव पार्वती नगरातील भांबरी चौकात घडली. याबाबत एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मंगळवारी पहाटे आरोपीला उचलले आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी बालाजी राजाराम सोमवंशी (वय ३८) हे आपल्या घराजवळ असताना, आरोपी चंद्रकांत नवन्नाथ कांबळे हा दारूच्या नशेत मोठ्याने शिवीगाळ करत होता. 'येथे फॅमिली राहते, शिवीगाळ करू नकोस' असे बालाजी यांनी त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग धरून आरोपीने 'तुला बघून घेतो' अशी धमकी देत बालाजी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आई आणि भावावरही वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून चाकू घेऊन फरार झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला मंगळवारी पहाटे उचलले आहे. भरवस्तीत झालेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत बालाजी सोमवंशी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी चंद्रकांत कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भावावर चाकूहल्ला... -
भांडण सोडवण्यासाठी बालाजी यांचा भाऊ नागेश सोमवंशी हा मध्यस्थी करण्यास आला असता, आरोपीने 'तुला खल्लास करतो' असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटावर चाकूने गंभीर वार केला. मुलाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या आई चंद्रकलावती सोमवंशी यांच्यावरही आरोपीने चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केले.
हल्ल्यात गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरु... -
या भीषण हल्ल्यात नागेश सोमवंशी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर लातुरातील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीने नागेश यांच्यावर चाकूने सपासप वार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हाणामारीत आरोपीही जखमी... -
मंगळवारी पहाटे आरोपीला ताब्यात घेतले असता, या घटनेत त्यालाही मार लागल्याने जखमी झाल्याचे समोर आले आहे. एकमेकांना करण्यात आलेल्या मारहाणीत हा प्रकार घडला आहे.
- दयानंद सानप, सपोनि. लातूर