तू माझ्यासाठी हे भाग्य लिहिलेस का? देवाला भावनिक पत्र लिहून तरुणाने स्वतःला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 19:47 IST2025-07-07T19:42:58+5:302025-07-07T19:47:01+5:30
तेलंगणात एका तरुणाने भगवान शंकराच्या नावाने पत्र लिहीत आत्महत्या केली.

तू माझ्यासाठी हे भाग्य लिहिलेस का? देवाला भावनिक पत्र लिहून तरुणाने स्वतःला संपवलं
Telagana Crime: तेलंगणातून आत्महत्येची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने भगवान शंकराला उद्देषून एक पत्र लिहीलं होतं. या पत्रामध्ये तरुणाने त्याच्या नशिबाबद्दल आणि जीवनातील अपयशांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. भगवान शिवाने त्याच्या मुलासोबत असेच केले असते का असा सवाल या तरुणाने पत्रातून विचारला आहे. तरुणाने लिहिलेल्या या पत्राची सर्वत्र चर्चा होत आहे.
रोहित असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने एमएससी पूर्ण केले होते आणि तो बी.एड. करत होता. रोहितला डॉक्टर व्हायचे होते मात्र तो त्याचे स्वप्न कधीच पूर्ण करु शकला नाही. आत्महत्येपूर्वी त्याने भगवान शंकराच्या नावाने एक चिठ्ठी लिहीली होती. पोलिसांना त्याच्याजवळ ही सुसाईड नोट सापडली. पत्रामध्ये त्याने "हे शिवा, तुझ्या सर्व क्षमतेने, तू माझ्यासाठी हे भाग्य लिहिलेस का? तू तुझ्या मुलासाठीही असेच भाग्य लिहशील का? आम्ही तुझी मुले नाही का?" असा सवाल केला होता.
"जगण्याचे दुःख हे मरण्याच्या दुःखापेक्षा जास्त आहे. मी थकलो आहे. कदाचित हेच माझे भाग्य आहे. मला माध्या आयुष्यात काही चांगले आणि दयाळू लोक भेटले, पण बाकीचे विसरणं चांगले हे चांगले ठरेल, असंही रोहितने म्हटलं.
दुसरीकडे, रोहितच्या कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की तो अनेकदा त्याच्या आयुष्याच्या बाबतीत असमाधानी आणि नाखूष होता. या घटनेमुळे तरुणांमध्ये मानसिक ताण आणि नैराश्याचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, हैदराबादमध्ये संशयास्पद मृत्यूचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. हायटेक सिटीमधील एका खाजगी कंपनीत काम करणारी २७ वर्षीय सुषमा २० जून रोजी घरी परतली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह आढळला. सुषमा ही सिकंदराबादची रहिवासी होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.