म्हातारीनं काठी फेकून मारली; संतापाच्या भरात म्हाताऱ्यानं केली बेदम मारहाण, उपचारादरम्यान म्हातारीचा मृत्यू
By अनिल गवई | Updated: December 17, 2022 17:19 IST2022-12-17T17:12:35+5:302022-12-17T17:19:11+5:30
याप्रकरणी म्हाताऱ्याविरोधात हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हातारीनं काठी फेकून मारली; संतापाच्या भरात म्हाताऱ्यानं केली बेदम मारहाण, उपचारादरम्यान म्हातारीचा मृत्यू
खामगाव : काठी फेकून मारल्याचा राग अनावर झालेल्या एका ७५ वर्षीय म्हाताऱ्याने म्हातारीला बेदम मारहाण केली. यात वर्मी घाव बसल्यामुळे म्हातारीचा खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री शिराळा येथे घडली. याप्रकरणी म्हाताऱ्याविरोधात हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्वताबाई एकनाथ वनारे (७०, रा. हिवरखेड) आणि एकनाथ महादू वनारे (७५, रा. शिराळा) दोघेही नात्याने पती पत्नी आहेत. शुक्रवारी सायंकाळी दोघांमध्ये शिराळा येथे किरकोळ वाद झाला. या वादातून म्हातारीने वृध्दाला काठी फेकून मारली. काठी फेकून मारल्याचा राग अनावर झालेल्या वृध्दाने तिला जीवजाईस्तोवर मारहाण केली. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच, त्यांनी जखमी अवस्थेत वृध्देला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान वृध्देची प्राणज्योत मालवली, अशी तक्रार शिराळा येथील पोलीस पाटील संतोष दत्तू आटाळ (४५) यांनी हिवरखेड पोलीसांत दिली. या तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी एकनाथ महादू वनारे या वृध्दा विरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.
वृध्दानेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत एकच खळबळ माजली आहे. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.