भय्यूजी महाराजांना मनोरुग्ण बनविण्याचा पलकने रचला होता कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 23:59 IST2022-01-28T23:58:56+5:302022-01-28T23:59:20+5:30
तांत्रिकाला दिली होती २५ लाखांची सुपारी, व्हॉटस्अॅप चॅटचा भक्कम पुरावा उघड

भय्यूजी महाराजांना मनोरुग्ण बनविण्याचा पलकने रचला होता कट
नरेश डोंगरे
नागपूर - देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पलक हीने तांत्रिकाला २५ लाखांची सुपारी दिली होती. तांत्रिकाच्या मदतीने भय्यूजी यांना मनोरुग्ण बनविण्याचे कटकारस्थान पलकने रचले होते, अशी माहिती पुढे आली आहे.
या बहुचर्चित प्रकरणाशी संबंधित तपास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पलकच्या मोबाईलमधून तिची ‘जिजू’शी होणारं व्हॉटस्अॅप चाट पोलिसांच्या हाती लागली होती. त्यात ती भय्यूजी महाराजांसाठी ‘बीएम’ या कोडवर्डच्या मदतीने तिच्या साथीदारांशी चर्चा करीत होती. जिजू नामक साथीदारांशी चॅटिंग करताना तिने ‘बीएम को पागल बनाकर घर मे बिठाना है... तांत्रिक को २५ लाख की सुपारी दी है’, असे म्हटल्याचे उघड झाले होते. तिच्या या चॅटिंगच्या आधारेच तिच्याविरुद्ध इंदूर पोलिसांना भक्कम पुरावे गोळा करता आले, असे तपास सूत्रांचे सांगणे आहे. भय्यूजी महाराजांसोबत लग्न करून त्यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीची ‘वारस’ होण्याची या कटामागे पलकची योजना होती. पोलीस तपासात त्या संबंधाने अनेक पुरावे उपलब्ध झाले होते, असेही सूत्रांचे सांगणे आहे.
११०५ दिवसांपासून आहेत तिघेही कारागृहात
आरोपींनी सहा वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला. मात्र, आरोपींना जास्तीत जास्त तीनच वर्षेच कारागृहात काढावे लागणार आहे. १२ जून २०१८ ला भय्यूजी महाराज यांनी स्वताच्या रिव्हॉल्वरने स्वताला गोळी घालून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा आज साडेतीन वर्षांनंतर निकाल आला. इंदूर (मध्यप्रदेश)चे अतिरिक्त सत्र न्यायाधिश धर्मेंद्र सोनी यांनी पलक, मुख्य सेवादार विनायक आणि शरद या तिघांना दोषी ठरवले. त्यांना प्रत्येकी सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्याच्या सहा महिन्यांनंतर या प्रकरणात या तिघांना आरोपी करण्यात आले होते. तेव्हापासून अटकेत असलेल्या या तिघांनी आतापर्यंत ११०५ दिवस कारागृहात काढले आहे. अर्थात, प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच या तिघांनी तीन तीन वर्षे कारावास भोगला आहे. तो त्यांच्या शिक्षेत मोडला जाणार आहे.