आई शिकवण्यासाठी शाळेत गेली होती, घरी परतल्यावर आढळला मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 17:17 IST2022-04-06T17:16:35+5:302022-04-06T17:17:24+5:30
Murder Case : पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे.

आई शिकवण्यासाठी शाळेत गेली होती, घरी परतल्यावर आढळला मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह
हिमाचल प्रदेशातील उना येथून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. मृत तरुणी दहावीची विद्यार्थिनी होती.
पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नगर पंचायत आंबजवळील प्रभाग क्रमांक-9 मध्ये मंगळवारी घडली. मारेकऱ्याने तरुणीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. याशिवाय शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या.
पोलिसांनी सांगितले की, मृत मुलीची आई सरकारी शाळेत शिक्षिका आहे. शाळेतून घरी परतल्यावर घरात मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह तिला दिसला. आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. ही घटना घडली तेव्हा मुलगी घरात एकटीच होती असे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा वेगवेगळ्या अंगांनी तपास करत आहेत. लवकरच या घटनेतील आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.