आईसह प्रियकराने केले दुष्कृत्य, मुलाची हत्या करून मध्य प्रदेशात नेऊन झाडाला लटकवला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 17:04 IST2022-01-27T17:02:40+5:302022-01-27T17:04:44+5:30
Murder Case : अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या मुलाची हत्या

आईसह प्रियकराने केले दुष्कृत्य, मुलाची हत्या करून मध्य प्रदेशात नेऊन झाडाला लटकवला मृतदेह
जळगाव : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या पुरुषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय १५,रा.जलाराम नगर, सावखेडा शिवार, जळगाव) या मुलाचा खून आईनेच प्रियकराच्या मदतीने केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आई मंगलाबाई विलास पाटील (वय ३५) व तिचा प्रियकर प्रमोद जयदेव शिंपी (वय ३८,रा.विखरण, ता.एरंडोल) या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्यांना २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलाबाई व प्रमोद शिंपी यांच्यात एक वर्षापासून अनैतिक संबंध होते. याची कुणकुण पुरुषोत्तम याला लागली. त्याने आईला हा प्रकार बंद करायला सांगितला, मात्र प्रेमात आकंठ बुडालेल्या मंगलाबाई व प्रमोद यांनी पुरुषोत्तमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन त्याचाच काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार १६ जानेवारी रोजी रावेर येथे कबुतर ठेवण्याचा पिंजरा घ्यायला जायचे सांगून दोघांनी त्याला मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या जंगलात नेले. जाताना रावेरातून दोर विकत घेतला.
बऱ्हाणपुर तालुक्यातील आसीरगड येथील जंगलात नेऊन तेथे गळफास देऊन ठार मारले. त्यानंतर झाडाला मृतदेह लटकवून दोघं जण परत आले. दुसऱ्या दिवशी मुलगा सापडत नाही म्हणून वडील विलास नामदेव पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. पोलीस तपासात बुधवारी धागेदोरे प्रमोद शिंपी पर्यंत पोहचले. त्याला ताब्यात घेऊन खाकी हिसका दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बुधवारी सायंकाळी घटनास्थळी जाऊन झाडाला लटकलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.