दुर्गंध पसरल्यानं घटना उघडकीस, बेपत्ता झालेल्या वृद्धाचा लिफ्टखाली अडकून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 21:22 IST2022-05-27T21:21:11+5:302022-05-27T21:22:08+5:30
Deadbody Fount under Lift : अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.

दुर्गंध पसरल्यानं घटना उघडकीस, बेपत्ता झालेल्या वृद्धाचा लिफ्टखाली अडकून मृत्यू
ठाणे : चंदनवाडी परिसरात लिफ्टच्याखाली अडकून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हा इसम दोन दिवसांपासून बेपत्ता होता. शुक्रवारी सायंकाळी वास येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.
चंदनवाडी परिसरात सातच्या जाई अ-८ही इमारत आहे. या इमारतीच्या लिफ्टच्या खाली अडकून नारायण बेलोसे(७०) यांचा मृत्यू झाला. नारायण बेलोसे हे याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर मुलासोबत राहत होते. बुधवारी रात्री ते राहत असलेल्या परिसरात एक कार्यक्रम होता. त्यात सहभागी झाल्यानंतर ते बेपत्ता होते. गुरुवारी सकाळपर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने नौपाडा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी दुर्गंध येऊ लागल्यानंतर इमारतीच्या रहीवाश्यांनी नौपाडा पोलीसांना याची माहिती दिली. त्यानंतर नौपाडा पोलीस आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी ठाणेअग्निशमन दलाचे जवान तिथे दाखल झाले. लिफ्टच्या खाली नारायण बेलोसे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचारी यांच्या मदतीने बेलोसे यांचा मृतदेह लिफ्ट रूममधून बाहेर काढून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.