हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 09:32 IST2025-12-29T09:31:54+5:302025-12-29T09:32:47+5:30
आरोपींनी तरुणीची हत्या केल्यानंतर तिची ओळख पटू नये या उद्देशाने तिचा चेहरा जाळला असून, हात-पाय बांधून तिला कचऱ्यात फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सेक्टर-१४२ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका डंपिंग यार्डमध्ये एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह बॅगेत बंद अवस्थेत आढळला आहे. आरोपींनी तरुणीची हत्या केल्यानंतर तिची ओळख पटू नये या उद्देशाने तिचा चेहरा जाळला असून, हात-पाय बांधून तिला कचऱ्यात फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कचरा वेचणाऱ्या महिलांना बसला धक्का
सेक्टर-१४५ येथील डंपिंग ग्राऊंडवर शनिवारी दुपारी काही महिला आणि मुले कचरा वेचण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना एक संशयास्पद काळ्या रंगाची मोठी बॅग पडलेली दिसली. कुतूहलापोटी त्यांनी ती बॅग उघडली असता, आतमध्ये तरुणीचा मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने आरडाओरडा करून पोलिसांना पाचारण केले.
ओळख पटवणे कठीण; पोलिसांची चार पथके तैनात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे वय २२ ते २५ वर्षांच्या दरम्यान आहे. तिच्या अंगावर लोअर आणि टी-शर्ट आहे. मारेकऱ्यांनी तिचा चेहरा जाळल्यामुळे तिची ओळख पटवणे सध्या कठीण झाले आहे. प्राथमिक तपासात तिची हत्या अन्य कुठे तरी करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह या निर्जन डंपिंग ग्राउंडवर आणून टाकल्याचा संशय आहे. तरुणीच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आहेत, मात्र शरीरावर इतरत्र जखमा नाहीत.
ऑनर किलिंगचा संशय?
नोएडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चार विशेष पथके तयार केली आहेत. ही घटना 'ऑनर किलिंग' असू शकते का? या दृष्टीनेही तपास केला जात आहे. आजूबाजूच्या परिसरातील आणि शेजारील जिल्ह्यांतील बेपत्ता मुलींची माहिती गोळा केली जात आहे. "आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत, लवकरच या हत्याकांडाचा उलगडा करून आरोपींना बेड्या ठोकल्या जातील," असे मध्य नोएडाचे एडीसीपी संतोष कुमार यांनी सांगितले. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र, या भीषण घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.