दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:23 IST2025-12-06T13:21:53+5:302025-12-06T13:23:24+5:30
एका महिलेने थेट लग्नमंडपात येऊन नवरदेव आपला पती असल्याचा दावा केला. इतकेच नव्हे तर..

AI Generated Image
पंजाबच्या मोगा येथे एका विवाह सोहळ्यादरम्यान मोठा गोंधळ उडाला आणि ऐनवेळी तो सोहळा थांबवावा लागला. एका महिलेने थेट लग्नमंडपात येऊन नवरदेव आपला पती असल्याचा दावा केला. इतकेच नव्हे तर, आपले ५ वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज झाले असून, दोघांना एक लहान मूलही असल्याचे तिने सांगितले. महिलेने तातडीने ११२वर तक्रार दाखल केली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचताच नवरदेव आणि नवरी यांनी तिथून पळ काढला. आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मंडपात '११२'वर कॉल; नवऱ्याची पोलखोल
मोगा येथील एका खासगी हॉटेलमध्ये एका विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी या पीडित तरुणीने लग्नाच्या ठिकाणी स्वतःला नवरदेवाची पहिली पत्नी असल्याचे सांगत ११२वर कॉल करून तक्रार केली आणि तात्काळ लग्नाचा कार्यक्रम थांबवला. तक्रारदार पीडित महिलेने आरोप केला की, ५ वर्षांपूर्वी तिचे नवरदेवाशी कोर्टात लग्न झाले होते आणि त्यांना ३ वर्षांचा एक मुलगाही आहे.
धमकावून करायला निघाला होता दुसरं लग्न!
पीडित महिलेच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांच्या मुलीने ६ वर्षांपूर्वी या व्यक्तीसोबत कोर्ट मॅरेज केले होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांना ३ वर्षांचा मुलगा देखील आहे. आईने सांगितले की, तरुणीचे बाबा या जगात नाहीत. घरात फक्त त्या, त्यांची मुलगी आणि नातू राहत आहेत. त्यांचा जावई त्यांना सतत त्रास देत होता आणि धमकावत होता आणि तो आता दुसरे लग्न करण्यासाठी निघाला होता. पीडित कुटुंबाने आता पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे.
नवरदेव पक्षाचा वेगळाच दावा
या संपूर्ण प्रकरणाला नवरदेव पक्षाकडून आलेल्या एका व्यक्तीने पूर्णपणे वेगळे वळण दिले. सुखदेव अब्रोल नावाच्या या व्यक्तीने दावा केला की, हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे ते येथे पार्टीसाठी आले होते. मात्र, पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाने जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने या सोहळ्यात गोंधळ घातला आहे.
पोलिसांचा तपास सुरू
सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी जतिंदर सिंग यांनी सांगितले की, फिरोजपूर येथील एका महिलेने ११२ वर तक्रार केली होती की, तिचा पती एका खासगी हॉटेलमध्ये दुसरे लग्न करत आहे. त्यामुळे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलिसांनी सांगितले की, जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना तिथे नवरदेव किंवा नवरी कोणीही आढळले नाही. पीडित महिलेने नवरदेवाच्या 'आनंद कारज' सोहळ्याचा एक व्हिडीओ मीडियाला दिला आहे. पोलीस आता या व्हिडीओ फुटेजची तपासणी करत आहेत आणि या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.