सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:57 IST2025-11-26T17:57:27+5:302025-11-26T17:57:55+5:30
सात जन्मांपर्यंत साथ देण्याची शपथ घेऊन विवाहबंधनात अडकलेल्या एका पतीने आपल्याच पत्नीला संपवण्यासाठी क्रूरतेचा कळस गाठला.

AI Generated Image
कर्नाटकची राजधानी बंगळूरजवळच्या अत्तिबेले भागात एक अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे माणुसकीही शरमेने मान खाली घालेल. सात जन्मांपर्यंत साथ देण्याची शपथ घेऊन विवाहबंधनात अडकलेल्या एका पतीने आपल्याच पत्नीला मारण्यासाठी तिच्या शरीरात चक्क पारा या धातूचे इंजेक्शन दिले. या क्रूर कृत्यानंतर पत्नीचा मृत्यूशी संघर्ष सुरू झाला. तब्बल नऊ महिने जीव वाचवण्यासाठी धडपडणारी विद्या अखेर मृत्यूशी ही लढाई हरली.
अत्तिबेले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे, जिथे ३० वर्षीय विद्या तिच्या कुटुंबासह राहात होती. एक सामान्य गृहिणी असलेल्या विद्याच्या आयुष्यात तिचा पती बसवराज आणि सासरा मारिस्वामचारी यांच्याकडून होणाऱ्या छळाचे भयानक सत्य दडले होते. विद्याने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले होते की, तिचा पती तिला सतत वेडी म्हणून हिणवत असे, घरात कोंडून ठेवत असे आणि तिचा अपमान करत असे.
२७ फेब्रुवारीची ती भयानक रात्र
२६ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री विद्या आपल्या खोलीत झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिला जाग आली, तेव्हा तिच्या मांडीत तीव्र वेदना जाणवत होत्या, जसे कोणीतरी इंजेक्शन टोचले असावे. तब्येत बिघडल्याने जेव्हा ती रुग्णालयात पोहोचली, तेव्हा तपास करणाऱ्या डॉक्टरांना धक्कादायक सत्य पाहून मोठा धक्का बसला. तिच्या शरीरात पारा आढळून आला होता, जे हळूहळू तिचे अवयव निकामी करत होते.
९ महिने मृत्यूशी झुंज, अखेर...
शरीरात विष पसरल्याचे निदान झाल्यानंतर विद्यावर ऑक्सफर्ड रुग्णालयात महिनाभर उपचार झाले, त्यानंतर तिला व्हिक्टोरिया रुग्णालयात हलवण्यात आले. विद्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते की, विष संपूर्ण शरीरात पसरले आहे आणि तिची किडनी निकामी होत आहे. यानंतर तिच्यावर डायलिसिस सुरू झाले, पण प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. नऊ महिने ती वेदना आणि तडफड सहन करत मृत्यूशी लढत राहिली आणि अखेर नोव्हेंबर महिन्यात तिने जगाचा निरोप घेतला.
पती आणि सासऱ्यावर हत्येचा गुन्हा
या हृदयद्रावक घटनेनंतर, बंगळूरच्या अत्तिबेले पोलिसांनी रविवार (२३ नोव्हेंबर २०२५) रोजी मृत विद्याने दिलेल्या जबाबाच्या आधारे तिचा पती बसवराज आणि सासरा मारिस्वामचारी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरनुसार, विद्याच्या शरीरात तिला मारण्याच्या उद्देशाने पारा टोचण्यात आला होता. पतीच्या या क्रूर कृत्यामुळे एका चार वर्षांच्या निष्पाप मुलाने त्याची आई गमावली आहे.