पाच वर्षांपासूनचे ‘संबंध’ आणि एका रात्रीत खून; बॅगेत भरला तरुणीचा मृतदेह, २४ तासांत आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 07:43 IST2025-11-27T07:43:24+5:302025-11-27T07:43:24+5:30
देसाई गावाकडून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर खाडीमध्ये पुलाखाली एका बॅगेमध्ये २४ नाेव्हेंबर राेजी दुपारी ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती डायघर पाेलिसांना मिळाली

पाच वर्षांपासूनचे ‘संबंध’ आणि एका रात्रीत खून; बॅगेत भरला तरुणीचा मृतदेह, २४ तासांत आरोपीला अटक
जितेंद्र कालेकर
ठाणे - बॅगेत भरलेला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह देसाई खाडीत मिळाला. सीसीटीव्हीतील फुटेज आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे यातील आराेपी विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (५०, रा. देसाईगाव, ठाणे, मूळगाव-गोरखपूर, उत्तरप्रदेश ) याला २४ तासांत अटक करण्यात डायघर पाेलिसांना यश आले. पाच वर्षांपासून तिच्याशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना एका रात्रीत तिच्याकडून शरीरसंबंधासाठी आलेल्या नकारामुळे संतापलेल्या विनोदने हा खून केल्याची माहिती तपासात उघड झाली.
देसाई गावाकडून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर खाडीमध्ये पुलाखाली एका बॅगेमध्ये २४ नाेव्हेंबर राेजी दुपारी ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती डायघर पाेलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पाेळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा खाडीच्या पाण्यातील भरावावर पडलेल्या बॅगेत गुडघ्यात पाय दुमडून भरलेला अर्धवट मृतदेह बाहेर आल्याचे आढळले. तिच्या हाताच्या मनगटाजवळ पीव्हीएस हे इंग्रजीत गाेंदलेले आद्याक्षर हाेते. कुजलेल्या अवस्थेतील या मृतदेहाची ओळख पटविण्यास काेणीही पुढे आला नाही. साेशल मीडियावरही माहिती प्रसारित केली; तर दुसरीकडे सहायक निरीक्षक संताेष चव्हाण, अनिल रजपूत आणि याेगेश लामखेडे या पथकाने सीसीटीव्ही पडताळणी केली. एकाने ही बॅग खाडी पुलावरून फेकल्याची माहिती खासगी प्रवासी कारचालकाने दिली. त्याच आधारे सीसीटीव्ही पडताळून विनाेद विश्वकर्मा या गवंडीकाम करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले.
नेमके काय घडले?
गेल्या पाच वर्षांपासून प्रमिला (२२, नावात बदल) हिच्यासोबत विनोद लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देसाई गावात राहत हाेता. २१ नाेव्हेंबर राेजी रात्री तिच्याशी शरीरसंबंध ठेवताना पाेटात दुखत असल्याच्या कारणावरून तिने ओरडून त्याला प्रतिकार केला. याच कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या विनाेदने तिचा गळा आवळून खून केला. एक दिवस मृतदेह घरातच ठेवला. दुर्गंधी सुटल्यानंतर विनोदने मृतदेह बॅगेत भरून खाडीत फेकला.