१० महिन्यांचं बाळ रुग्णालयातून गेले चोरीला, रडून-रडून आईची अवस्था झाली बिकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 19:53 IST2022-07-02T19:47:13+5:302022-07-02T19:53:34+5:30
10 Months Old Baby Stolen : डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी शेजारी बसलेल्या महिलेच्या स्वाधीन केले आणि ते औषध घेण्यासाठी गेले.

१० महिन्यांचं बाळ रुग्णालयातून गेले चोरीला, रडून-रडून आईची अवस्था झाली बिकट
मिर्झापूर : उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील मंडल हॉस्पिटलमधून १० महिन्यांचे बाळ चोरीला गेले आहे. सीसीटीव्ही खराब असल्यामुळे मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलाचा शोध सुरू केला. गुरुवारी दुपारी लालगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बामी गावातील एक कुटुंबातील सदस्य आपल्या मुलाला घेऊन डॉक्टरांना भेटण्यासाठी आले होते. डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी शेजारी बसलेल्या महिलेच्या स्वाधीन केले आणि ते औषध घेण्यासाठी गेले. ती व्यक्ती परत आली तेव्हा बाळ बेपत्ता असल्याचे त्याने पाहिले. मुलं बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने रुग्णालयाच्या विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी लालगंजमधील बामी गावात राहणारे विजय कुमार आणि त्यांची भाची सोनी १० महिन्यांच्या मुलावर उपचारासाठी रुग्णालयात आले होते. डॉक्टरांना दाखवल्यानंतर शेजारी बसलेल्या महिलेला बाळ दिल्यानंतर भाची सोनी औषध घेण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. थोड्या वेळाने ती परत आली तेव्हा मुलगा बेपत्ता होता. बराच शोध घेऊनही बालक सापडले नाही. मूल चोरीला गेल्याने रुग्णालयाच्या विभागात एकच खळबळ उडाली आहे.
माहिती मिळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहोचले. एएसपी संजय वर्मा यांनी सांगितले की, एक कुटुंब आपल्या मुलाला डॉक्टरांना दाखवण्यासाठी आले होते. नंतर रुग्णालयातूनच मूल चोरीला गेल्याची माहिती मिळाली. मुलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे स्थानक, बसस्थानक आदी ठिकाणी शोध सुरू आहे. तर दुसरीकडे मूल चोरीला गेल्याने आईची रडून रडून हालत खराब झाली आहे.