'तो राक्षस मेलेलाच बरा!' मुलाच्या एन्काऊंटरनंतर वडिलांनी मृतदेह नाकारला; म्हणाले, 'आज मी शांत झोपेन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:27 IST2025-10-14T17:27:00+5:302025-10-14T17:27:26+5:30
उत्तर प्रदेशात एका आरोपीच्या एन्काऊंटरनंतर मृताच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह स्विकारण्यास नकार दिला आहे.

'तो राक्षस मेलेलाच बरा!' मुलाच्या एन्काऊंटरनंतर वडिलांनी मृतदेह नाकारला; म्हणाले, 'आज मी शांत झोपेन'
UP Crime:उत्तर प्रदेशात गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरू असताना, मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या शहजाद उर्फ निकी (वय ३५) नावाच्या गुन्हेगाराचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेनंतर अधिक आश्चर्यकारक बाब म्हणजे, आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला असून, त्याच्या वडिलांनी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. मुलाच्या मृत्यूमुळे आयुष्यात शांतता आल्याचे वडिलांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण?
शहजाद उर्फ निकी हा मोहम्मदपूर साकिस्त गावातील रहिवासी असून त्याच्यावर बलात्कार, विनयभंग, चोरी आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत सातहून अधिक गुन्हे दाखल होते. नुकताच तो एका पाच वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार प्रकरणात हवा होता. एवढेच नाही तर, त्याने शनिवारी रात्री पीडित कुटुंबाला केस मागे घेण्यासाठी धमकावले होते आणि त्यांच्या घरावर गोळीबारही केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली होती.
सोमवारी सरूरपूर पोलिस ठाणे परिसरात सर्धना-बिनोली रोडजवळ नियमित तपासणी सुरू असताना शहजाद पोलिसांच्या हाती लागला. यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात शहजाद गंभीर जखमी झाला आणि त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
वडिलांनी मृतदेह घेण्यास दिला नकार
या घटनेनंतर शहजादचे वडील रहीसुद्दीन आणि आई नसीमा यांनी पोलीस ठाणे गाठून मुलाचा मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. "मी १५ वर्षांपूर्वीच शहजादसोबतचे सर्व संबंध तोडले होते आणि तेव्हापासून तो माझ्यासाठी मेलेलाच आहे. तो आमच्यासाठी राक्षसासारखा होता. त्याने अनेक चुकीची कामे केली. पोलिसांच्या कारवाईमुळे आम्हाला आनंद झाला आहे. त्याला बेवारस मृतदेह म्हणून दफन करावे. मला आयुष्यभर त्रास झाला आहे. आज मी शांत झोपेन," असे रहीसुद्दीन यांनी पोलिसांना सांगितले.
शहजादने वयाच्या ९ व्या वर्षी गुन्हे करायला सुरुवात केली आणि त्याला सुधारण्याच्या सर्व प्रयत्नांना त्याने विरोध केला. त्याने दोनदा पोलिसांसमोर आत्मसमर्पणही केले, पण तो अजूनही सुधारला नव्हता. शहजादच्या कृत्यांमुळे कंटाळलेल्या त्याच्या कुटुंबीयांनी योगी सरकार आणि मेरठ पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी केलेल्या कारवाईत एक पोलिस कर्मचारी थोडक्यात बचावला, गोळी त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटला लागली. पोलिसांना घटनास्थळी एक पिस्तूल आणि मोटारसायकल मिळाली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांतील हा सातवा पोलिस एन्काऊंटर आहे.