‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 06:19 IST2025-11-24T06:18:24+5:302025-11-24T06:19:04+5:30
४ शिक्षकांसह ९ जणांना अटक, ९ जण चौकशीसाठी ताब्यात, सूत्रधार साताऱ्याचा, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
मुरगूड (जि. कोल्हापूर) : महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या आणि तीन लाखांत पेपर देणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सोनगे (ता. कागल) येथून ४ शिक्षकांसह नऊ जणांना अटक केली आहे तर अन्य नऊ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कराडमधून अटक केली. अटक केलेल्या आरोपींना दोन दिवसांची कोठडी मिळाली आहे.
रविवारी राज्यभरात विविध केंद्रांवर ४ लाख ४६ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेचा पेपर बाहेर काढण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही तरुण करत असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार यांना मिळाली. पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर सोनगे (ता. कागल) येथील शिवकृपा फर्निचर मॉलमध्ये छापा टाकला. त्यावेळी दत्तात्रय चव्हाण, गुरुनाथ चौगले, अक्षय कुंभार, किरण बरकाळे व नागेश शेंडगे हे त्याठिकाणी टीईटी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्याकडून मूळ कागदपत्रे घेऊन टीईटी पेपरची झेरॉक्स देण्याच्या तयारीत असल्याचे आढळले.
याठिकाणी पेपर घेण्यासाठी पाच विद्यार्थीदेखील उपस्थित होते. याठिकाणी विविध शिक्षण संस्थांची प्रमाणपत्रे, कोरे चेक, प्रिंटर, मोबाइल, चारचाकी वाहन असा १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पेपर फोडणारे हेच ते आरोपी...
दत्तात्रय आनंदा चव्हाण (वय ३२, ता. राधानगरी), गुरुनाथ गणपती चौगले (ता. राधानगरी), अक्षय नामदेव कुंभार (२७, ता. कागल), किरण साताप्पा बरकाळे (३०, ता. राधानगरी), नागेश दिलीप शेंडगे (३०, ता. राधानगरी), राहुल अनिल पाटील (३१, ता. गडहिंग्लज), दयानंद भैरू साळवी (४१, ता. कागल), अभिजित विष्णू पाटील (४०, ता. कागल) व रोहित पांडुरंग सावंत (३५, ता. राधानगरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा अधिक तपास सुरू आहे.
चौकशीत उघड झाले की, साताऱ्यातील महेश गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, तोच टीईटी परीक्षेचा पेपर राहुल पाटील याला पुरवत असे. पाटील हा स्वतः एजंटमार्फत परीक्षार्थ्यांना पेपर देत असे व प्रत्येक विद्यार्थ्याकडून ३ लाख रुपये आणि शैक्षणिक मूळ कागदपत्रे घेत असे, असे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.