मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 09:12 IST2025-12-17T09:11:11+5:302025-12-17T09:12:09+5:30
Mumbai Delhi expressway Accident: मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर पिकअप वाहन आणि ट्रक यांच्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा होरपळून मृ्त्यू झाला. चालक होरपळला असून, त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
बुधवारी भल्या पहाटे मुंबई दिल्ली एक्स्प्रेसवेवर एक भीषण अपघात झाला. ट्रकला जाऊन धडकल्यानंतर पिकअप वाहनाने पेट घेतला. आगीच्या लोळात सापडलेल्या तिघांचा जळून कोळसा झाला. यात चालकही गंभीर भाजला असून, त्याच्या जयपूर येथे उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कसा झाला, याबद्दलचे कारण कळू शकलेले नाही.
राजस्थानातील अलवर जिल्ह्यात असलेल्या रैनी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई दिल्ली एक्स्प्रेसवेवर एक पिकअप वाहन दिल्लीवरून जयपूरच्या दिशेने येत होते. रैनी पोलीस ठाणे हद्दीत असतानाच पिकअप वाहनाचा भयंकर अपघात झाला.
राष्ट्रीय महामार्गावरून पिकअप वाहन एका ट्रकच्या मागे होते. अचानक वाहन जाऊन ट्रकवर आदळले. त्यानंतर वाहनाने पेट घेतला. क्षणार्धातच पिकअप वाहनाला आगीच्या लोळांनी घेरले. यात पिकअप वाहनातील तिघे जिवंत जळाले.
अपघाताबद्दल कळताच रैनी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. महामार्ग मदत पथकही आले. वाहनाला लागलेली आग बऱ्याच वेळानंतर नियंत्रणात आणण्यात यश आले. पिकअपमधून चार लोक प्रवास करत होते. त्यात तीन लोक पूर्णपणे जळाले. तर चालक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
मृतांची ओळख पटली असून, मोहित हा हरयाणातील बहादूरगडचा रहिवासी आहे. दीपेंद्र आणि पदम हे मध्य प्रदेशातील सागर येथील आहेत. जखमी चालक झज्जर हा हरयाणातील हन्नी येथील रहिवासी आहे.