Ten person arrested in Yerawada due to mobile status | मोबाईलवरील स्टेटसवरुन येरवड्यात हाणामारी १० जणांना अटक
मोबाईलवरील स्टेटसवरुन येरवड्यात हाणामारी १० जणांना अटक

ठळक मुद्देहाणामारी करणारे एकाच गटातील असून त्यांच्यापैकी १० जणांना पोलिसांनी केली अटक

पुणे : मोबाईलवर सहा महिन्यांपूर्वी ठेवलेल्या स्टेटस व एकमेकांकडे पाहण्यावरुन तिघांवर कोयता व गजाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना येरवड्यातील आशापुरा स्टोअरसमोर मंगळवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास घडली़. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. हाणामारी करणारे हे सर्व एकाच गटातील असून त्यांच्यापैकी १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे़. या प्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़.
या प्रकरणी रमाशंकर हिरालाल जैस्वाल (वय १८, रा. येरवडा) याने फिर्याद दिली आहे.  या प्रकरणी विजय रमेश राठोड (वय २४), रोहित राम कांबळे (वय १९), सागर संतोष माने (वय १९),अमित सुरेश गायकवाड (वय १९), गणेश शिवाजी पाटील (वय २४), साहिल संतोष सोनवणे (सर्व रा़ येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची  नावे आहेत. यापैकी  तिघे जण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, रमाशंकर हा त्याच्या मित्रासोबत रस्त्याच्याकडेला गप्पा मारत थांबला होता. यावेळी आरोपी तीन दुचाकीवरुन आरडा-ओरडा करत त्याठिकाणी आले आणि त्यांनी कोयते फिरवत दहशत निर्माण केली. यानंतर रमाशंकर व त्यांच्या मित्राला तुम्हाला माज आला आहे का? आम्हाला बघुन सुद्धा तुम्ही का थांबलात? आमची भीती वाटत नाही का? असे म्हणत त्यांच्या साथीदारांना ‘चला रे यांची आज येथे विकेटच काढू’ असे म्हणून रमाशंकर याला पकडून हाता-बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर दोघांनी रमाशंकर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्याविरोधात विजय राठोड (वय २४, रा़ येरवडा) याने फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, ओमकार युवराज सोनवणे (वय २०), प्रज्वल बापु कदम (वय १९), आशिष अशोक परदेशी (वय २१), राजवीरसिंग रणजितसिंग सहोगा (वय १९, सर्व रा़ रामनगर, येरवडा) या चौघांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. राठोड याच्या फिर्यादीनुसार, हा प्रकार पांडु लमाणवस्ती येथे पहाटे सव्वादोन वाजता घडला़ विजय राठोड व त्यांचे मित्र घरासमोर उभे असताना मनोज जैस्वाल हा मोटारसायकलवरुन सारखा ये-जा करीत असल्याने त्याने व त्याच्या वहिनीने गल्लीत लहान मुले खेळत असतात़, गाडी हळू चालव, असे सांगितले होते़ त्याचा राग मनात धरुन त्याने साथीदारांसह हातात लोखंडी कोयता व गज घेऊन परिसरात दहशत पसरवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच राठोडचा मित्र रोहित कांबळे व सागर माने यांना शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले.

Web Title: Ten person arrested in Yerawada due to mobile status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.