हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:12 IST2025-12-01T18:11:43+5:302025-12-01T18:12:48+5:30
वीरण्णा यांनी पिकासाठी काही लोकांकडून आणि सावकारांकडून तब्बल १५ लाख रुपयांचं मोठं कर्ज घेतलं होतं.

हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
तेलंगणाच्या खम्माम जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे कर्ज आणि पीक यामुळे त्रस्त असलेल्या एका शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. राज्याचे कृषी मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्या मतदारसंघात ही धक्कादायक घटना घडली असून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
रिपोर्टनुसार, खम्माम जिल्ह्यातील नेलकोंडपल्ली मंडळातील शंकरगिरी थांडा येथील ४५ वर्षीय शेतकरी बानोथु वीरण्णा यांनी त्यांच्या शेतात विषप्राशन करून आत्महत्या केली. वीरण्णा हा भूमिहीन शेतकरी होते आणि त्यांनी उपजीविकेसाठी ५ एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरण्णा यांनी यावर्षी पिकासाठी काही लोकांकडून आणि सावकारांकडून तब्बल १५ लाख रुपयांचं मोठं कर्ज घेतलं होतं. त्यांनी या पिकावर खूप आशा ठेवल्या होत्या. मात्र राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि पूरपरिस्थितीमुळे त्यांचं संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं. पिकांच्या नुकसानीमुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर कोसळला.
आर्थिक अडचणी आणि भविष्याच्या चिंतांमुळे निराश झालेल्या वीरण्णा यांनी सोमवारी रात्री उशिरा शेतात विषारी कीटकनाशक घेतलं. त्याआधी त्यांनी मोबाईलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्यांची परिस्थिती आणि आत्महत्या का केली हे सांगितलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.