थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:45 IST2026-01-13T17:44:13+5:302026-01-13T17:45:09+5:30
आपल्या जावयासोबत असलेल्या प्रेमसंबंधांत अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच हत्या घडवून आणली.

फोटो - ABP News
तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आपल्या जावयासोबत असलेल्या प्रेमसंबंधांत अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच हत्या घडवून आणली. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी पत्नी आणि जावयासह एकूण ६ आरोपींना अटक केली असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
धर्मपुरी जिल्ह्यातील एरंगाट्टू कोट्टई भागात आरुमुगम आपल्या पत्नीसह, दोन मुली आणि दोन मुलांसोबत राहत होते. ते स्थानिक मेडिकल शॉपमध्ये काम करायचे. ७ जानेवारी रोजी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले, पण रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यानंतर पत्नीने ९ जानेवारी रोजी धर्मपुरी टाउन पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
तपासादरम्यान ११ जानेवारी रोजी मथिगोनापलयम जवळील थुथारैयान तलावात एका पुरुषाचा मृतदेह पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याची ओळख आरुमुगम म्हणून पटवली. शवविच्छेदन अहवालात आरुमुगम यांच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याचं समोर आलं, ज्यावरून त्यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला.
पत्नी आणि जावयावर संशय बळावला
पोलिसांनी आरुमुगम यांची पत्नी ज्योती आणि जावई सीतारामन यांच्यासह अनेक जणांची चौकशी केली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली की, ज्योती आणि सीतारामन यांचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. सीतारामन विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. त्याच्या पत्नीला या संबंधांची माहिती मिळाल्यावर त्यांच्यात भांडण झालं आणि ती माहेरी निघून गेली होती.
सासू आणि जावयाचे प्रेमसंबंध सुरू
धक्कादायक बाब म्हणजे, ज्योती हे संबंध संपवण्यास तयार नव्हती. सीतारामनच्या दबावाखाली तिने सहा महिन्यांपूर्वी आपल्या मोठ्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं होतं. लग्न झाल्यावरही सासू आणि जावयाचे प्रेमसंबंध सुरूच राहिले. आरुमुगम यांना जेव्हा पत्नीच्या या कृत्याबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी तिला विरोध केला. येथूनच त्यांच्या हत्येचा कट रचला गेला.
कट रचून पतीची निर्घृण हत्या
७ जानेवारी रोजी आरुमुगम कामावर जात असताना वाटेतच सीतारामन आणि त्याच्या चार साथीदारांनी त्यांचं अपहरण केलं. आरोपींनी त्यांना निर्जनस्थळी नेऊन दगडाने ठेचून गंभीर जखमी केले. आरुमुगम बेशुद्ध पडल्यावर ही आत्महत्या किंवा अपघात वाटावा या हेतूने त्यांचा मृतदेह थुथारैयान तलावात फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी ज्योती, सीतारामन, सरवनन, जयशंकर, प्रवीणकुमार आणि मुरुगन या ६ आरोपींना अटक करून त्यांची रवानगी जेलमध्ये केली आहे.