हैदराबाद हादरले! ऑटो-रिक्षात दोन तरुणांचे रहस्यमय मृतदेह; तिसरा साथीदार फरार, गूढ वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:38 IST2025-12-04T12:36:05+5:302025-12-04T12:38:30+5:30
हैदराबादमध्ये एका रिक्षात दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

हैदराबाद हादरले! ऑटो-रिक्षात दोन तरुणांचे रहस्यमय मृतदेह; तिसरा साथीदार फरार, गूढ वाढले
Hyadrabad Crime: हैदराबाद शहराच्या चंद्रायंगुट्टा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी चंद्रायंगुट्टा उड्डाणपुलाखाली एका ऑटो-रिक्षात दोन तरुणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सापडलेल्या वस्तू आणि प्राथमिक तपासावरून हे मृत्यू अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झाले असावेत, असा पोलिसांना संशय आहे.
मृत्यू झालेल्या तरुणांची नावे जहांगीर (वय २४, रा. पहाडी शरीफ) आणि इरफान (वय २५, रा. रियासत नगर) अशी आहेत. दोघेही ऑटो चालक होते. स्थानिकांनी सकाळी ८:३० च्या सुमारास पार्क केलेल्या ऑटोमध्ये दोघांना बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. चंद्रायंगुट्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दोन्ही तरुण प्रवासी सीटवर बसलेल्या अवस्थेत मृत आढळले. त्यांच्या शरिरावर कोणत्याही बाह्य जखमा नव्हत्या.
पोलिसांना घटनास्थळी तीन सिरिंज आणि ऍट्रानियम नावाच्या इंजेक्शनचे रिकामे ॲम्प्यूल सापडले आहेत. ऍट्रानियम हे शस्त्रक्रियांमध्ये वापरले जाणारे स्नायू शिथिल करणारे औषध आहे. फॉरेन्सिक टीमने सिरिंज आणि ॲम्प्यूल जप्त करून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले आहेत. मृतदेहांचे व्हिसेरा नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण आणि त्यांनी कोणते औषध घेतले होते, हे स्पष्ट होईल.
तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग
पोलिसांच्या प्राथमिक तपासात, जहांगीर आणि इरफान हे गांजाचे व्यसनी होते. घटनेच्या रात्री ते दोघे आणि कल्याण नावाचा तिसरा व्यक्ती एका दुचाकीवरून महबूबनगर चौकाजवळ आले. तिथे ते इरफानच्या ऑटोमध्ये बसले, जिथे त्यांच्यासोबत आणखी एक ऑटोचालक, सैफुद्दीन अक्रम, हजर होता. कल्याण वगळता इतर तिघांनी कथितरित्या मध्यरात्री १२:३० च्या सुमारास अंमली पदार्थ किंवा इंजेक्शन घेतले. हे इंजेक्शन जहांगीरने आणले होते. ऍट्रानियम इंजेक्शन पुरवणाऱ्या व्यक्तीची फक्त त्यालाच माहिती होती, असे अक्रम आणि कल्याण यांनी चौकशीत सांगितले. इंजेक्शन घेतल्यानंतर जहांगीर आणि इरफान तत्काळ बेशुद्ध झाले, तर अक्रमला अस्वस्थ वाटू लागले. कल्याणने त्याला पाणी दिले आणि तिथून निघून गेला. त्यानंतर, अक्रमही ते दोघे झोपले असतील असे समजून तिथून निघून गेला.
दोघांचेही मृतदेह उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी अपमृत्यूअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ऍट्रानियम हे डॉक्टरांच्या देखरेखीखालीच द्यायचे औषध असून त्याचा वापर इतर कुठल्या कामासाठी केला जात नाही, असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. पोलीस आता तांत्रिक पुरावे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत, जेणेकरून या घटनेतील सर्व कड्या जोडता येतील आणि पुरवठादाराचा शोध घेता येईल.