बंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका कन्नड टीव्ही अभिनेत्री तथा अँकरच्या पतीने तिच्यावर चाकूने वार केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मंजुला श्रुतीच्या पतीला तिच्यावर विवाहबाह्य संबंधांचा संशय होता. श्रुती तिच्या पतीसोबत हनुमंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुनेश्वरा परिसरात राहत होती. श्रुतीने अमृतधारा नावाच्या मालिकेतून आपली ओळख निर्माण केली आहे.
साधारणपणे २० वर्षांपूर्वी श्रृती आणि तिचा पती अमरेश यांनी प्रेमविवाह केला होता. या जोडप्याला दोन मुलेही आहेत. ते हनुमंतनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी श्रुती तिच्या भावाकडे राहायला गेली होती.
त्यांच्यात घरावरूनही वाद झाला होता. श्रुतीने तिच्या पतीविरुद्ध हनुमंतनगर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. श्रुती तीन महिन्यांनंतर, गेल्या गुरुवारी पतीच्या घरी गेली होती. तक्रारीनुसार ही घटना ४ जुलै रोजी घडली. आरोपानुसार, दोन्ही मुले कॉलेजला गेल्यनंतर, अमरेशने श्रुतीवर हल्ला केला. अमरेशने प्रथम पेपर स्प्रे वापरला आणि नंतर चाकूने हल्ला केला. त्याने श्रुतीच्या छातीवर, मांडीवर आणि मानेवर वार केले आहेत. याशिवाय अमरेशने श्रुतीचे डोकेही भिंतीवर आपटले आहे.
श्रुतीवर व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पतीविरुद्ध हनुमंतनगर पोलिस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाला होता आणि हनुमंतनगर पोलिस ठाण्यात दोन गुन्हेही दाखल आहेत. आता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.