टिंडरवर मैत्री, भेटायला बोलावलं; जेवताना ती म्हणाली बाथरूममध्ये जा, बाहेर येताच तरुणाचा खेळ खल्लास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:29 IST2026-04-03T11:29:30+5:302026-04-03T11:29:54+5:30
सुरतमध्ये टिंडरवर झालेल्या मैत्रीने तरुणाला ९ लाखांचा फटका दिला आहे.

टिंडरवर मैत्री, भेटायला बोलावलं; जेवताना ती म्हणाली बाथरूममध्ये जा, बाहेर येताच तरुणाचा खेळ खल्लास!
सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सच्या जमान्यात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते, याचे जिवंत उदाहरण सुरतमध्ये समोर आले आहे. टिंडर या प्रसिद्ध डेटिंग ॲपवर एका महिलेशी मैत्री करणे एका तरुणाला तब्बल ८.९५ लाख रुपयांना पडले आहे. या महिलेने तरुणाला गुंगीचे औषध देऊन त्याचे सोन्याचे दागिने लुटले आणि पोबारा केला. या घटनेने सुरतच्या पाल पोलीस ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मैत्रीचा असा विणला जाळा
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या शाहपोर भागात राहणारे ३९ वर्षीय प्रशांतभाई शाह हे शेअर बाजार आणि प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी त्यांची भेट टिंडरवर सारिका गुप्ता नावाच्या एका महिलेशी झाली. सारिकाने स्वतःला सुपारीचा मोठा व्यवसाय करणारी महिला असल्याचे भासवले आणि आपण कामासाठी वारंवार सुरतला येत असल्याचे सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रशांतभाई तिच्या प्रेमात पडले.
हॉटेलमध्ये रचला क्रूर कट
सारिकाने सुरतमध्ये आल्यावर पालनपूर कॅनाल रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि प्रशांतभाईंना भेटायला बोलावले. प्रशांतभाई उत्साहाने जेवण घेऊन हॉटेलवर पोहोचले. तिथे गेल्यावर सारिकाने एक चाल खेळली. ती म्हणाली, "इतर काही व्यापारी यायला उशीर होणार आहे, तोपर्यंत आपण दोघे मिळून जेवण उरकून घेऊया."
बाथरूममध्ये पाठवलं अन् घात केला!
जेवणावेळी सारिकाने सांगितले की, तिच्या घरच्यांचा व्हिडिओ कॉल येत आहे आणि प्रशांतभाईंना काही वेळ बाथरूममध्ये जाण्याची विनंती केली. प्रशांतभाई बाथरूममध्ये जाताच तिने त्यांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. बाहेर आल्यावर तिने स्वतःला भूक नसल्याचे सांगत केवळ प्रशांतभाईंना जेवण्यास भाग पाडले.
१४ तासांनंतर आली शुद्ध, पण तोपर्यंत...
संध्याकाळी ६ वाजता जेवण केल्यानंतर प्रशांतभाई जागीच बेशुद्ध झाले. तब्बल १४ तासांनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता त्यांना शुद्ध आली. डोळे उघडले तेव्हा सारिका हॉटेलमधून फरार झाली होती. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील दोन अंगठ्या असा एकूण ८.९५ लाख रुपयांचा ऐवज गायब होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पाल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि टिंडरवरील प्रोफाइलची कसून चौकशी केली जात आहे. "अशा डेटिंग ॲप्सवर कोणाशीही मैत्री करताना किंवा भेटताना सावधगिरी बाळगा," असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.