मुलाचे वहिनीशी अनैतिक संबंध; विरोध करणाऱ्या आईचा काटा काढला; एका दोरीने उलगडलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:30 IST2026-03-13T15:30:16+5:302026-03-13T15:30:43+5:30
सुरतमध्ये एका मंदिराबाहेर सापडलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले.

मुलाचे वहिनीशी अनैतिक संबंध; विरोध करणाऱ्या आईचा काटा काढला; एका दोरीने उलगडलं सत्य
Gujarat Crime: आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना गुजरातच्या सुरतमध्ये उघडकीस आली आहे. आपल्या वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या आईची मुलानेच हत्या केल्याचे समोर आले आहे. या कटात मुलाला त्याच्या वहिनीने आणि तिच्या वडिलांनी साथ दिली. हत्येनंतर आई हरवल्याचा बनाव रचणाऱ्या नराधम मुलाचे बिंग सुरत क्राईम ब्रँचने अवघ्या काही तासांत फोडले आहे.
मयत हमिदा खातून (५५) या आपल्या दोन मुलांसोबत संयुक्त कुटुंबात राहत होत्या. धाकटा मुलगा परवेझ याचे त्याच्या मोठ्या भावाच्या पत्नीशी, म्हणजेच शबानाशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक नात्यामुळे घरात वारंवार पैशांवरून आणि चारित्र्यावरून वाद होत असत. हमिदा खातून यांचा या नात्याला प्रखर विरोध होता आणि हाच विरोध त्यांच्या जिवावर बेतला.
हत्येचा कट आणि थरार
१० मार्च रोजी परवेझ, शबाना आणि शबानाचे वडील फिरोज आलम यांनी मिळून हमिदा यांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यांनी हमिदा यांची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह रात्रभर घरातच लपवून ठेवला. ११ मार्च रोजी मृतदेह एका गोणीत भरून मंदिराच्या जवळ फेकून दिला.
स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन रचला बनाव
हत्या केल्यानंतर आरोपी परवेझने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आपली आई कपडे खरेदी करायला बाजारात गेली आणि परतलीच नाही, अशी तक्रार दाखल केली. मात्र, बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास पोलिसांना एक प्लास्टिकच्या गोणीत बांधलेला मृतदेह सापडला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली.
दोरीच्या एका तुकड्याने फोडलं बिंग
सुरत क्राईम ब्रँचने तपास सुरू केला असता त्यांना मृतदेहाचे हात-पाय ज्या दोरीने बांधले होते, तशीच दोरी हमिदा यांच्या घरातही सापडली. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. परवेझ आणि शबाना यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या जबाबात विसंगती आढळली. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी आपला गुन्हा कबूल केला.
CCTV फुटेज आणि बिहारमधून अटक
या गुन्ह्यात शबानाचे वडील फिरोज आलम यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये फिरोज पांढऱ्या रंगाची गोणी खांद्यावर घेऊन शांतपणे जाताना दिसला, तोच पोलिसांसाठी सर्वात मोठा पुरावा ठरला. हत्येनंतर फिरोज बिहारला पळून गेला होता. बिहार एसटीएफच्या मदतीने त्याला पाटणा रेल्वे स्थानकावरून बेड्या ठोकण्यात आल्या.
ना पश्चात्ताप, ना दुःख!
धक्कादायक बाब म्हणजे, अटक केल्यानंतरही आरोपी मुलगा परवेझ आणि सून शबाना यांच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप दिसत नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.