खळबळजनक! ठाण्यात वैफल्यग्रस्त सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 20:26 IST2021-10-19T20:25:37+5:302021-10-19T20:26:12+5:30
Suicide case : येऊर परिसरातील एका खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

खळबळजनक! ठाण्यात वैफल्यग्रस्त सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
ठाणे - ठाण्यात बाळासाहेब साळुंखे (६२) या वैफल्यग्रस्त निवृत्त पोलीस जमादाराने येऊर परिसरातील एका खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ते ठाणे शहर वाहतूक शाखेतून निवृत्त झाले होते.
ठाणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेतून चार वर्षापूर्वी निवृत्त झालेले साळूंखे हे वागळे इस्टेट , श्रीनगर भागात वास्तव्याला होते. गेल्या काही महिन्यांपासून वैफल्यग्रस्त असलेले साळुंखे तीन दिवसांपूर्वीच घरातून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येऊरच्या जंगलात त्यांनी एका खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली. त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ओळखपत्रच्या आधारे त्यांची ओळख पटली. त्यांनतर त्यांच्या कुटूंबीयांनीही हा त्यांचा मृतदेह असल्याचे सांगितले. ते दारुच्याही आहारी गेले होते. त्यांच्या मागे पत्नी , मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सांगितले.