BARC तील वैज्ञानिकाच्या बेपत्ता मुलाची हत्या की आत्महत्या?; एलिफंटाजवळ मृतदेह सापडल्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 14:48 IST2018-10-05T14:46:27+5:302018-10-05T14:48:39+5:30
घारापुरी बेटावर एलिफंटा गुहांजवळ नमनचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मृतदेह कुजत असल्याने पोलिसांनी घटनास्थळीच त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

BARC तील वैज्ञानिकाच्या बेपत्ता मुलाची हत्या की आत्महत्या?; एलिफंटाजवळ मृतदेह सापडल्यानं खळबळ
मुंबई - मुंबईतील भाभा अणुउर्जा संशोधन केंद्रातील (BARC) वैज्ञानिकाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला आहे. नमन दत्त असं या मुलाचं नाव असून तो १७ वर्षांचा आहे. २३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून तो बेपत्ता झाला होता आणि याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. घारापुरी बेटावर एलिफंटा गुहांजवळ नमनचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे नमनने आत्महत्या केली कि त्याची हत्या करण्यात आली याचा पोलीस तपास करत आहेत. मृतदेह कुजत असल्याने पोलिसांनी घटनास्थळीच त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
नमन हा काही दिवसांपासून नैराश्यात होता. तो नैराश्यातून बाहेर येण्यासाठी वैद्यकीय उपचार देखील सुरु होते. घरातल्या एका व्यक्तीच्या निधनामुळे त्याला जबरदस्त धक्का बसला होता. नवी मुंबईतील सेक्टर १७ मधील अर्चना ज्योती सोसायटीत वैज्ञानिक भास्कर दत्त आणि पत्नी मानसोपचार चंद्रा रामामुर्थी आणि त्याचा मुलगा नमन हे राहत होते. २३ सप्टेंबरला नमनचे आईवडील रात्री दहाच्या सुमारास त्याला शुभरात्री अशा शुभेच्छा देऊन त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले होते. त्याचे वडील मध्यरात्री पाणी प्यायला उठले तेव्हा त्यांना नमन खोलीत दिसला नाही. घरात तो कुठेच दिसत नसल्याने त्यांनी आणि नमनची आई चंद्रा यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सगळीकडे शोधूनही न सापडल्याने त्यांनी २४ तारखेला सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दत्त कुटुंब रहात असलेल्या सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तसेच पोलिसांनी वाशी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही देखील तपासलं होतं. यात नमन लोकल ट्रेनमध्ये चढल्याचं दिसलं. मात्र, तो कुठे उतरला हे मात्र कळू शकलं नाही. नमनने वाशी खाडीत उडी मारून जीव दिला असावा आणि त्याचा मृतदेह लाटांसोबत घारापुरी येथे आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.