बलात्काराच्या आरोपात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची पोलीस ठाण्यात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 20:07 IST2021-09-23T20:05:13+5:302021-09-23T20:07:48+5:30
Suicde Case : डेथ इन कस्टडी ? : गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आत्मघात

बलात्काराच्या आरोपात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची पोलीस ठाण्यात आत्महत्या
अमरावती : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर आयुक्तालयातील वलगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात गुरुवारी दुपारी ४ ते ५ च्या सुमारास ही घटना घडली. गेल्या ३४ दिवसांमधील अमरावती आयुक्तालयातील ही दुसरी डेथ इन कस्टडी ठरली आहे.
अरूण बाबाराव जवंजाळ (५०, रा. आष्टी, ता. भातकुली, जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पंचनाम्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश व भातकुलीचे उपविभागीय अधिकारी वलगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. वृत्त लिहिस्तोवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात आहे.
सीआयडीचे अधीक्षक अमोघ गावकर व उपअधीक्षक दीप्ती ब्राम्हणे यांनी तपासाची प्रक्रिया आरंभली आहे. पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीवर फिर्यादीचे बयाण नोंदविणे सुरू असताना अरूण जवंजाळ यांना आष्टी येथून ताब्यात घेऊन वलगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारातील एका खोलीत बसवून ठेवण्यात आले. ते तेथे एकटेच होते. ती संधी साधत त्यांनी स्वत:च्या शर्टच्या सहाय्याने तेथील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार उघड झाला. बलात्कार व पोस्कोचा गुन्ह्याची नोंद दुपारी ४.४४ वाजता करण्यात आली. त्याआधीच त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.