खाकीवर डाग! महिलेसमोर नग्न होणारा पोलीस अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 16:39 IST2019-05-16T16:38:50+5:302019-05-16T16:39:51+5:30
घडलेल्या घटनेची शहनिशा करून पोलीस कॉन्स्टेबल हरिशचंद्र लहाने (४३) याला नेहरू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या

खाकीवर डाग! महिलेसमोर नग्न होणारा पोलीस अटकेत
मुंबई - मुंबई पोलीस दलात वर्दीला लाजविणारी घटना कुर्ल्यात घडली आहे. नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेसमोर एक पोलीस कॉन्स्टेबल नग्न झाला आणि त्याने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. त्यामुळे लज्जा उत्पन्न झाल्याने पीडित महिलेने नेहरू नगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. घडलेल्या घटनेची शहनिशा करून पोलीस कॉन्स्टेबल हरिशचंद्र लहाने (४३) याला नेहरू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
१० मे रोजी पीडित महिला आपल्या घराच्या बाल्कनीत बसली होती. त्यावेळी समोरच्या घरात राहणाऱ्या शेजाऱ्याने महिलेला पाहून अश्लील शेरेबाजी केली. काही वेळ महिलेला पोलीस कॉन्स्टेबल लहानेची शेरेबाजी कळली नाही. दरम्यान लहाने घरातील एका रूममध्ये गेला. पुन्हा महिलेसमोर आला आणि नग्न झाला. त्यानंतर तो तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करू लागला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने पोलीस नियंत्रण कक्षास फोन लावून मदत मागितली. नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घडलेल्या घटनेची चौकशी करत आरोपी पोलिसाला बेड्या ठोकल्या.
हरीशचंद्र लहाने हा पंत नगर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करतो. मात्र, गेल्या ३ महिन्यांपासून गैरहजर असून त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली.