शेतातील काम आटपून आपल्या भावासोबत घराकडे जात अन् भरधाव टिप्परची दुचाकीस धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 21:56 IST2021-09-20T21:56:35+5:302021-09-20T21:56:55+5:30
Accident Case : बिबीपासून जवळच असलेल्या पिंपरी खंदारे येथील शोभा मधुकर नवघरे या शेतातील काम आटपून आपल्या भावासोबत दुचाकी क्र. एमएच २८ एजी ३५१३ ने घराकडे जात हाेते.

शेतातील काम आटपून आपल्या भावासोबत घराकडे जात अन् भरधाव टिप्परची दुचाकीस धडक
बिबी : भरधाव टिप्परने दुचाकीस धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली़. ही घटना २० सप्टेंबर राेजी सायंकाळी औरंगाबाद - नागपूर हायवेवर पिंपरी गावाजवळ घडली़. शोभा मधुकर नवघरे (वय ५५) असे मृतक महिलेचे नाव आहे.
बिबीपासून जवळच असलेल्या पिंपरी खंदारे येथील शोभा मधुकर नवघरे या शेतातील काम आटपून आपल्या भावासोबत दुचाकी क्र. एमएच २८ एजी ३५१३ ने घराकडे जात हाेते. औरंगाबाद - नागपूर हायवेवर पिंपरी गावाजवळ बिबीकडून रेती घेऊन मेहकरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहन टिप्पर क्रमांक एमएच २८ एबी ८२६९ ने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील शाेभा नवघरे या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डाेक्याला मार लागला. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला. मृतक महिलेच्या पश्चात पती, सहा मुली व नातवंडे असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच बिबी पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली़ तसेच पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी बिबी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार एल. डी़. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस करीत आहेत.
अवैध रेती वाहतुकीने घेतला बळी
परिसरातील रेती घाटांचा लिलाव झालेला नसतानाही सर्रास वाहतूक सुरू आहे. रेतीने भरलेले टिप्पर भरधाव जात असल्याने अपघात वाढले आहेत. परिसरात अनेक रेतीमाफियांनी रेतीचा अवैध साठा करून ठेवलेला आहे. या रेतीमाफियांवर कारवाई करण्याची गरज आहे.