सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 11:56 IST2025-06-09T11:55:15+5:302025-06-09T11:56:06+5:30
खरे तर, सोनमला अटक केल्यानंतर आणखी एक नाव विशेषत्वाने समोर आले असून या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
हनिमूनसाठी मेघालयात गेलेला इंदूरचा राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम यांच्या स्टोरीला आता वेगळे वळण मिळाले आहे. राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर, आता खुद्द सोनमलाच त्यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सोनमने सोमवारी सकाळी स्वतःच यूपीतील गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले. राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी सोनमसोबतच आणखी तीन जणांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने राजा रघुवंशीला मारण्यासाठी सुपारी दिली होती. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
यासंदर्भात बोलताना मेघालयचे डीजीपी इदाशिशा नोंगरांग म्हणाले, सोनमने आपल्या पतीच्या हत्येसाठी सुपारी दिली होती. यांपैकी एका आरोपीला यूपीतून पकडण्यात आले आहे. तर दोन आरोपींना एसआयटीने इंदूर येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आणखीही काही लोकांची नावे सांगितली आहेत. तत्पूर्वी, सोनमने यूपीतील नंदगंज पोलीस ठाण्यात सरेंडर केले आणि यानंतर तिला अटक करण्यात आली.
खरे तर, सोनमला अटक केल्यानंतर आणखी एक नाव विशेषत्वाने समोर आले असून या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'राज कुशवाह, असे हे नाव आहे. लग्नापूर्वी, याच कुशवाहसोबत सोनमचे अफेअर सुरू होते. यामुळे तर, आपल्या या अफेअरसाठी सोनमने राजा रघुवंशीची सुपारी देऊन हत्या केली नसेल ना? असे कयास बांधले जात आहेत.
गाझीपुरला कशी सापडली सोनम? -
७ दिवसांनंतर सोनम गाझीपूरमधील एका ढाब्यावर सापडली. सोनमने ढाब्यावरून तिच्या कुटुंबाला फोन करून तिचे ठिकाण सांगितले. कुटुंबाने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर गाझीपूर पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतले. ती शिलाँगहून गाझीपूर कशी पोहोचली आणि या १७ दिवसांत तिच्यासोबत काय घडले हे जाणून घेण्यासाठी पोलीस सध्या तिची चौकशी करत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा सोनम थकली होती आणि अस्वस्थ अवस्थेत दिसत होती.