भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 10:50 IST2025-05-25T10:49:11+5:302025-05-25T10:50:03+5:30
एका आदिवासी महिलेने २५ हजारांच्या कर्जासाठी तिच्या मुलाला गहाण ठेवलं होतं. पण जेव्हा ती कर्ज फेडायला गेली तेव्हा तिला मोठा धक्काच बसला.

फोटो - आजतक
आंध्र प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका आदिवासी महिलेने २५ हजारांच्या कर्जासाठी तिच्या मुलाला गहाण ठेवलं होतं. पण जेव्हा ती कर्ज फेडायला गेली तेव्हा तिला मोठा धक्काच बसला. तिला मुलाचा मृतदेह सापडला. आरोपीने या मुलाला पुरलं होतं. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अनक्कम्माचा पती चेंचैया याने आरोपीकडून २५,००० रुपये कर्ज म्हणून घेतले होते. चेंचैयाच्या मृत्यूनंतर आरोपीने संपूर्ण कुटुंबाला जबरदस्तीने आपल्याकडे मजुरीसाठी ठेवलं. हे कुटुंब अत्यंत गरीब होतं आणि त्यांनी एक वर्ष अतिशय वाईट परिस्थितीत मजूर म्हणून काम केलं. आरोपीने व्याजाच्या नावाखाली कर्जाची रक्कम ४५,००० रुपये केली आणि पैसे परत करेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही असं सांगितलं.
जेव्हा अनक्कम्माने विनंती केली तेव्हा त्याने एक अट घातली की तिला एका मुलाला गहाण ठेवावं लागेल. नाईलाज असल्याने अनक्कम्माने यासाठी होकार दिला. अन्नकम्मा अधूनमधून तिच्या मुलाशी फोनवर बोलत असे. मुलगा वारंवार त्याच्या आईला इथून घेऊन जाण्यास सांगत होता आणि दिवसरात्र काम करायला लावल्याबद्दल तक्रार करत होता. तो शेवटचं त्याच्या आईशी १२ एप्रिल रोजी बोलला होता.
एप्रिलच्या अखेरीस, अनक्कम्माने कशी तरी पैशांची व्यवस्था केली, पण जेव्हा ती तिच्या मुलाला परत आणण्यासाठी गेली तेव्हा आरोपीने कारणं द्यायला सुरुवात केली. मुलाला दुसऱ्या ठिकाणी पाठवलं आहे, तो रुग्णालयात आहे, तो पळून गेला आहे अशी वेगवेगळी कारणं द्यायचा. जेव्हा अनक्कम्माला संशय आला तेव्हा तिने आदिवासी नेत्यांची मदत घेतली आणि स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला.
चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केलं की मुलाचा मृत्यू झाला आणि त्याला तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यात त्याच्या सासरच्या घराजवळ पुरण्यात आलं होतं. पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला आहे. आरोपी, त्याची पत्नी आणि मुलगा या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.