ग्रेटर नोएडामधील निक्की भाटी हत्याकांडात पोलिसांना निक्कीच्या सासूला, दया भाटी हिला पोलिसांनी अटक केली आहे. निक्कीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तिच्या सासरच्या मंडळींनीच तिला जिवंत जाळून मारले. यात तिच्या सासूचाही सहभाग होता. या प्रकरणात निक्कीचा पती विपिन भाटी याला आधीच अटक करण्यात आली होती, आणि काल रविवारी पोलीस कस्टडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याचा एन्काऊंटर झाला.
पतीच्या पायाला गोळी, सासूला अटक
आरोपी विपिन भाटी पोलिसांचे शस्त्र हिसकावून कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी ग्रेटर नोएडाच्या सिरसा चौकाजवळ झालेल्या चकमकीत त्याच्या पायाला गोळी लागली. विपिन भाटी जखमी झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. निक्कीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तिच्या पती आणि सासरच्या मंडळींनी तिला हेतुपुरस्सर जाळून मारले.
बहिणीच्या तक्रारीमुळे पोलिसांची तात्काळ कारवाई
निक्कीची मोठी बहीण कंचन हिने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. आरोपी पती विपिन भाटीला अटक करण्यात आली. तसेच इतर आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता विपिन भाटीची आई दया हिला अटक करण्यात आली आहे.
सासूने ज्वलनशील पदार्थ आणून दिला?
निक्कीची बहीण कंचनने गंभीर आरोप केला आहे की, तिच्या सासू दया आणि पती विपिन यांनी गुरुवारी मिळून ही घटना घडवली. "सासू दयाने ज्वलनशील पदार्थ आणून विपिनला दिला. त्यानंतर विपिनने तो निक्कीवर टाकला. सगळ्यांनी मिळून तिला जिवंत जाळून मारले," असे कंचनने सांगितले. तिच्या म्हणण्यानुसार, तिने आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी तिचे काहीच ऐकले नाही.
कंचनच्या तक्रारीवरून पोलिसांनी निक्कीचा पती विपिन भाटी, दीर रोहित भाटी, सासू दया आणि सासरे सतवीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. एफआयआरमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तांत्रिक पुराव्यांसह कुटुंबीयांच्या जबाबांच्या आधारावर तपास पुढे सुरू आहे.