हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 13:34 IST2025-10-02T13:33:42+5:302025-10-02T13:34:02+5:30
हे आरोपी दिल्लीला विमानाने जाऊन तेथील हाफिज (रा. मेरठ) व लखविंदर सिंह (रा. रायपूर) यांच्याकडून चोरीच्या गाड्या महाराष्ट्रात आणत होते

हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय हाय-प्रोफाइल कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून तब्बल ८३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत ५ चोरीच्या आलिशान कार जप्त करण्यात आल्या. या कारवाईन्वये दिल्लीतील पाच गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
हे आरोपी दिल्लीला विमानाने जाऊन तेथील हाफिज (रा. मेरठ) व लखविंदर सिंह (रा. रायपूर) यांच्याकडून चोरीच्या गाड्या महाराष्ट्रात आणत होते. त्यानंतर गाड्यांचे मूळ इंजिन व चेसी नंबर काढून बनावट नंबर बसवत आणि खोटे आरटीओ रजिस्ट्रेशन तयार करून विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पथकाने ४ आलिशान कार, मोबाइल हँडसेट असा ८३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ३१८ (४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदला आहे.
आरोपींवर यापूर्वी सातारा, सांगली, पिंपरी-चिंचवडसह दिल्ली, मध्य प्रदेश व कर्नाटकातील अनेक पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक भीमगोंडा पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कागदपत्रे नसल्याने संशय
दरम्यान, मुळेगाव तांड्याशेजारी संशयास्पदरीत्या उभी असलेली पांढरी आलिशान कार पाहून पथकाने चौकशी केली असता वाहनातील ४ व्यक्तींकडे कागदपत्रे नव्हती. वाहनाची झडती घेतली असता, त्यावरील चेसी व इंजिन नंबर बदलून बनावट प्रिंट बसवलेले आढळले. यामध्ये अजीम सलीमखान पठाण (वय ३६, रा. रहिमतपूर, सातारा), प्रमोद सुनील वायदंडे (वय २६, रा. धामनेर स्टेशन, सातारा), फिरोज शिराज मोहम्मद (वय ३५, रा. आर.टी.नगर, बंगळुरू), इरशाद सफिउल्ला सय्यद (रा. कोलार, कर्नाटक) यांचा समावेश आहे.