१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:56 IST2025-10-20T17:55:49+5:302025-10-20T17:56:53+5:30
महिलेचे पुतण्यासोबत प्रेमसंबंध होते. यावरून वाद झाल्यानंतर महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं.

फोटो - ndtv.in
उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पोलीस ठाण्यामध्येच आपल्या हाताची नस कापून घेतली. महिलेचे तिच्या पुतण्यासोबत प्रेमसंबंध होते. यावरून वाद झाल्यानंतर महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं. आलोक मिश्रा असं पुतण्याचं नाव आहे. या घटनेनंतर गंभीर अवस्थेत महिलेला लखनौला पाठवण्यात आलं आहे.
सीतापूरमधील पिसावा पोलीस स्टेशनच्या कुतुबनगर भागात ही धक्कादायक घटना घडली. पूजा मिश्रा आणि तिचा पुतण्या आलोक मिश्रा यांना त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या नात्यातील वाद सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यामध्येच बोलावण्यात आलं होतं. पोलिसांच्या उपस्थितीत आलोक मिश्राने पूजासोबतचं नातं पुढे सुरू ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर निराश होऊन पूजाने ब्लेडने तिच्या हाताची नस कापली. अचानक घडलेल्या या घटनेने पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली.
पूजा मिश्राचं लग्न गाझियाबाद येथील रहिवासी ललित कुमार मिश्रा याच्याशी झालं होतं. त्यांना वंश (७) आणि अंश (६) ही दोन मुलं आहेत. ललित मिश्राने त्याचा पुतण्या आलोक मिश्रा याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी बोलावलं होतं. याच दरम्यान, विवाहित पूजा आणि तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या आलोक यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ललित मिश्राला हे कळताच त्याने आलोकला तेथून हाकलून दिलं.
पूजा तिच्या दोन्ही मुलांना सोडून आलोकसोबत बरेलीला गेली, जिथे ते सुमारे सात महिने राहिले. आलोक बरेलीमध्ये रिक्षा चालवत होता. नंतर पूजा आणि आलोकमध्ये वाद निर्माण झाले, त्यानंतर आलोक सीतापूरच्या पिसावा भागातील त्याच्या मूळ गावी मढिया येथे परतला. पूजाला जेव्हा कळलं की, आलोक तिला सोडून जाऊ इच्छित आहे, तेव्हा ती सीतापूरलाही गेली आणि नंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलीस ठाण्यात आलोकने पूजासोबत राहण्यास नकार दिला. तेव्हा ती नाराज झाली. आपल्या हाताची नस कापून घेतली. पोलिसांनी महिलेला लगेचच महिलेला जवळच्या रुग्णालयात नेलं. तिची प्रकृती गंभीर असल्याने, तिला पुढील उपचारांसाठी लखनौ येथे रेफर करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.