हृदयद्रावक! भावाच्या जीवाची भीक मागत होती बहीण; पण कोणीच केली नाही मदत, झाली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:38 IST2025-05-22T13:38:02+5:302025-05-22T13:38:46+5:30
बाईक टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करणाऱ्या कंवलजीतची हत्या करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला.

फोटो - nbt
दिल्लीमध्ये भयंकर घटना घडली आहे. बाईक टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करणाऱ्या कंवलजीतची हत्या करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. त्याची धाकटी बहीण प्रीतीने "आईवडील आधीच गेलेले असल्याने कंवलजीत संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत होता. पूर्वी तो एका डिलिव्हरी कंपनीत काम करायचा, आता तो बाईक टॅक्सी चालवून घर चालवत होता. पण सोमवारी जे घडले त्यामुळे सगळं संपलं" असं म्हटलं आहे.
प्रीती म्हणाली की, जेव्हा तिच्या भावावर हल्ला झाला तेव्हा ती परिसरात वाचवा, वाचवा असं ओरडत होती. तिने अनेका लोकांच्या घरांचे दरवाजे ठोठावले , पण कोणीही मदतीसाठी आलं नाही. जेव्हा माझ्या भावाचा मृत्यू झाला, तेव्हा लोक बाहेर आले. कंवलजीतची पत्नी ज्योतीने सांगितलं की, "सोमवारीच अपेंडिक्स ऑपरेशननंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता."
"कंवलजीत आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला. त्यानंतर आरोपीने बाथरूममध्येच त्याच्यावर चाकूने हल्ला केला. तो स्वत:ही मला वाचवा, मला वाचवा..." असं म्हणत होता. "मी माझ्या भावाच्या जीवाची भीक मागत होती. पण कोणीही मदतीसाठी आलं नाही. कोणाही घराचा दरवाजा उघडला नाही. मी खूप ओरडत होते. जर लोक बाहेर आले असते तर हल्लेखोर पळून गेला असता आणि माझ्या भावाचा जीव वाचला असता."
"कोणीही हिंमत दाखवली नाही. याचा फायदा घेत आरोपीने कंवलजीतवर ३० हून अधिक वेळा चाकूने हल्ला केला" असं प्रीतीने म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. याच अल्पवयीन मुलाने गेल्या वर्षी जुलैमध्ये याच परिसरातील एका तरुणाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. कंवलजीतच्या हत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.