"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:39 IST2025-12-10T11:37:24+5:302025-12-10T11:39:23+5:30
१५०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रविंद्र नाथ सोनी या मास्टरमाईंडने स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) समोर आता नवीन नाटक केलं आहे.

फोटो - आजतक
१५०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रविंद्र नाथ सोनी या मास्टरमाईंडने स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) समोर आता नवीन नाटक केलं आहे. "साहेब, मी दुबईत कचोरी विकून कसंतरी कुटुंबाचं पोट भरतो. कुटुंब चालवणंही अवघड झालं होतं" असं सुरुवातीच्या चौकशीत हात जोडत म्हटलं आहे. पण SIT ला त्याच्या या दाव्यावर अजिबात विश्वास बसला नाही. कारण टेबलवर बँक स्टेटमेंट, गुंतवणुकीची कागदपत्रं, गुंतवणूकदारांच्या तक्रारी आणि विदेशी बँक अकाऊंटचे डिटेल्स यांचा ढिग पडला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ADCP क्राईम अंजली विश्वकर्मा यांच्या टीमने सोनीसमोर त्याच्या कंपन्यांची रजिस्ट्रेशन, विदेशी फंडिंग आणि बँक अकाऊंटचे डिटेल्स ठेवले. गेल्या सात वर्षांपासून तो याच कंपन्यांचा वापर करून लोकांना जास्त परताव्याचे आमिष दाखवत होता. चौकशीदरम्यान, SIT ने सोनीला त्याच्या हाय-प्रोफाइल संबंधांबाबत प्रश्न विचारले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो ज्या व्हिडीओंचा वापर करत होता, ते अभिनेता आणि रेसलर यांच्यासोबतचे व्हि़डीओ होते.
दुबईतून पळून थेट डेहराडूनला पोहोचला
सोनीने कबूल केलं की, कंपनीत अनेक संचालक होते आणि वेळोवेळी सर्वजण आपापल्या वाट्याचे पैसे काढून घेत होते. गुंतवणूकदारांचा दबाव वाढल्यावर तो घाबरला आणि दुबईतून पळून थेट डेहराडूनला पोहोचला. सोनी स्वतःला गरीब दाखवण्याचा कितीही प्रयत्न करत असला तरी त्याचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, बिझनेस कार्ड्स आणि ईमेल ट्रेल काहीतरी वेगळीच गोष्ट सांगत होते. त्याचे दुबईतील कार्यालय लाखो डॉलर्सच्या व्यवहारांचे केंद्र होतं. तो विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पंचतारांकित हॉटेल्समध्ये आकर्षक कार्यक्रम आयोजित करायचा, जेणेकरून कंपनीला ग्लोबल ब्रँड'च असल्याची ओळख मिळेल.
कानपूरमध्ये झाली अटक
मुख्य कंपनी 'ब्लूचिप कमर्शियल ब्रोकर' २०१८ पासून सक्रिय होती आणि याद्वारेच विदेशी गुंतवणूकदारांचे पैसे रिअल इस्टेट व गोल्ड मायनिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फिरवले जात होते. सोनीच्या दुबईतून पळून जाण्याची गोष्ट तर एखाद्या फिल्मी गोष्टीपेक्षा कमी नाही. दुबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये त्याने देश सोडल्याची कोणतीही नोंद नव्हती. त्याने एका तस्करांच्या टोळीच्या मदतीने ओमानमध्ये प्रवेश केला आणि तिथून भारतात विमानाने डेहराडून गाठलं. स्थानिक गुंतवणूकदारांनी दुबई पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की सोनी देश सोडून जाऊच शकत नाही. पण काही दिवसांनी कानपूरमधून त्याच्या अटकेची बातमी आली आणि सगळेच चक्रावून गेले.
७०० हून अधिक लोकांची कोट्यवधींची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनीच्या कमीत कमी १६ कंपन्या रजिस्टर होत्या. त्यातील बऱ्याच कंपन्या वेगवेगळ्या नावांवर आणि प्रमोटर्सवर होत्या, जेणेकरून एका कंपनीची चौकशी झाल्यास संपूर्ण नेटवर्क धोक्यात येऊ नये. कानपूरचे पोलीस आयुक्त रघुबीर लाल यांनी माहिती दिली की, आतापर्यंत ७०० हून अधिक लोक या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. सुमारे ९०% फसवणूक झालेले लोक भारतीय असून उर्वरित नेपाळ, चीन, जपान, अमेरिका आणि फ्रान्ससारख्या देशांतील आहेत.