दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 11:04 IST2025-10-23T11:00:18+5:302025-10-23T11:04:07+5:30
बिहार निवडणुकांमध्ये दहशत माजवण्याचा कट रचणाऱ्या मोस्ट वाँटेड सिग्मा गँगचा दिल्लीत एन्काउंटर

दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट
Delhi Encounter: बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी दिल्ली पोलिसांनी एका गुंड टोळीचा खात्मा केला आहे. बिहारमध्ये दहशत पसरवण्याचा कट रचणाऱ्या बिहारमधील चार कुख्यात गुंडांना दिल्ली पोलिसांनी आणि बिहार पोलिसांनी संयुक्त कारवाईत रोहिणी येथे झालेल्या चकमकीत ठार केले आहे. ठार झालेल्या गुंडांमध्ये 'सिग्मा अँड कंपनी' नावाच्या कुख्यात टोळीचा म्होरक्या रंजन पाठक याचा समावेश आहे.
२२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुमारे २:२० वाजता रोहिणी परिसरातील बहादुर शाह मार्ग, डॉ. आंबेडकर चौक ते पंसाली चौक या दरम्यान ही चकमक झाली. दिल्ली पोलीस क्राईम ब्रँचला हे गुंड दिल्लीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलीस पथक सांगितलेल्या ठिकाणी तपासणी करत असताना गुंडांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. यावेळी पोलीस आणि गुंडांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत चारही गुंडांना गोळ्या लागल्या आणि त्यांना उपचारासाठी रोहिणी येथील डॉ. बीएसए रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या गोळीबारात दिल्ली पोलीस क्राईम ब्रँचचे इन्स्पेक्टर अरविंद, एसआय मनीष आणि एसआय नवीन यांच्यासह चार पोलिसांच्या बुलेटप्रूफ जॅकेटला गोळ्या लागल्या, मात्र ते बचावले. एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या गुंडांमध्ये रंजन पाठक (२५), बिमलेश महतो उर्फ बिमलेश साहनी (२५), मनीष पाठक (३३) आणि अमन ठाकूर (२१) यांचा समावेश आहे. यापैकी रंजन, बिमलेश आणि मनीष हे बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी होते, तर अमन ठाकूर दिल्लीतील करावल नगर येथील होता.
बिहारच्या पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गुंड 'सिग्मा अँड कंपनी' नावाने कुख्यात होते आणि त्यांचा म्होरक्या रंजन पाठक होता. हा टोळी नेपाळपासून बिहारपर्यंत कार्यरत होता. कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून काम करणारी टोळी बिहारमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये, विशेषतः ५ हून अधिक मोठ्या हत्याकांडांमध्ये वाँटेड होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही टोळी बिहारमध्ये मोठ्या कारवाया करून दहशत माजविण्याचा कट रचत होती. या कटाची माहिती एका ऑडिओ कॉलवरून पोलिसांना मिळाली होती. या टोळीने नुकतीच ब्रह्मर्षी समाजाचे जिल्हाध्यक्ष गणेश शर्मा यांची हत्या केली होती, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
गुन्हे केल्यानंतर रंजन पाठकची गँग दिल्लीत येऊन लपत होती. याच गुप्त माहितीच्या आधारे बिहार पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचशी संपर्क साधून संयुक्त ऑपरेशन यशस्वी केले. रंजन पाठक हा तोच गुंड आहे, ज्याने सीतामढीतील एका हत्याकांडानंतर माध्यमांना स्वतःचा बायोडाटा पाठवून दहशत निर्माण केली होती.