धक्कादायक! लातूरमध्ये शेतीच्या तुकड्यासाठी सख्ख्या भावानेच दुसऱ्याला संपवलं अन् मृतदेह...
By राजकुमार जोंधळे | Updated: February 22, 2026 22:14 IST2026-02-22T22:13:51+5:302026-02-22T22:14:40+5:30
गुलाब खरोसे खून प्रकरणाचा ७२ तासांत थरारक उलगडा

धक्कादायक! लातूरमध्ये शेतीच्या तुकड्यासाठी सख्ख्या भावानेच दुसऱ्याला संपवलं अन् मृतदेह...
राजकुमार जाेंधळे, लातूर: येथे आज नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. जमिनीच्या एका तुकड्यासाठी सख्ख्या भावानेच भावाचा काटा काढला. रामलिंग मुदगड (ता. निलंगा) येथे ही घटना उघडकीस आली. ७२ तासांच्या थरारक तपासानंतर लातूर स्थानिक गुन्हे शाखाने खुनाचा छडा लावत आरोपी भावाला बेड्या ठोकल्या. आरोपीला २४ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १८ फेब्रुवारीला रामलिंग मुदगड गावात भयावह प्रकार घडला. गावातील गुलाब विलास खरोसे (वय ३४) यांचा मृतदेह शेताच्या बांधावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. डोक्यावर गंभीर वार आणि गळा आवळल्याच्या खुणा पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला. ७० वर्षांचा वृद्ध पिता असलेले विलास खरोसे यांनी मुलाच्या मृत्यूची तक्रार कासार सिरसी पाेलिस ठाण्यात दिली. मात्र, कोणालाही कल्पना नव्हती की या खुनामागे घरातीलच भाऊच असेल. पाेलिसांनी आरोपी उल्हास खराेसे याला अटक केली.
कुटुंबीयांचे मौन अन् पोलिसांची तपास नीती
गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला प्रारंभी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, ज्यांच्या घरातील माणूस गेला होता, ते कुटुंबीयच पोलिसांना सहकार्य करण्यास टाळाटाळ करत होते. पोलिसांना संशय आ की घरचेच काहीतरी लपवत आहेत. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयाची सुई मृताचा धाकटा भाऊ उल्हास विलास खरोसे (वय ३२) याच्याकडे वळली. पोलिसांनी जेव्हा त्याला ताब्यात घेत खाक्या दाखवला, त्यावेळी त्याचे अवसान गळाले आणि त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
शेतीच्या वादाचा खुनाने शेवट
गेल्या अनेक दिवसांपासून गुलाब आणि उल्हास यांच्यामध्ये शेती अन् घरगुती कारणावरून टोकाचे वाद होत होते. १७ फेब्रुवारीच्या सायंकाळी रागाच्या भरात उल्हासने आपल्याच भावावर हल्ला करून त्याची हत्या केली. जमिनीचा ताबा मिळवण्याच्या हव्यासापोटी त्याने मोठ्या भावालाच ठार केले.