निवडणुकीच्या रिंगणात जादूटोणाचा धक्कादायक प्रकार; झाडाला लिंबू अन् खिळे ठोकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:39 IST2021-02-10T13:37:12+5:302021-02-10T13:39:40+5:30
Superstition : तीन जणांचे नाव लिॅहुन झाडाला लिंबू आणि खिळे ठोकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

निवडणुकीच्या रिंगणात जादूटोणाचा धक्कादायक प्रकार; झाडाला लिंबू अन् खिळे ठोकले
वडगाव मावळ - सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी जिल्हात सदस्यांचे अपहरण केल्याच्या घटना ताज्या असताना मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीआधी जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन जणांचे नाव लिहुन झाडाला लिंबू आणि खिळे ठोकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत विद्यमान सदस्य अविनाश मारूती असवले यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रायणी नदी जवळ भैरवनाथ मंदिरासमोर पिंपळाच्या झाडाला अविनाश असवले, भुषन असवले व रूषीनाथ शिंदे यांच्या नावाने लिंबाला खिळे ठोकून झाडाला लावले होते. ही माहिती समजल्यावर शिवाजी असवले, व इतरजण पाहण्यासाठी गेले. शहानीशा केल्यांनंतर त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.पोलिसांनी घटनास्थळी जाउन तिघांचे फलक काढून नदीत फेकून दिले.समाजात अंधश्रध्दा पसवणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. सरपंच पदाचे आरक्षण सर्व साधारण पुरूष निघाले. त्यामुळे सरपंच पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. १३ पैकी ९ सदस्य बाहेरगावी गेले आहेत. कितीही खिळे ठोकले तरी राष्ट्रवादीचाच सरपंच होणार. आमचे १३ पैकी ९ सदस्य बाहेर गेले आहेत. कितीही जादूटोणा केला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचाच सरपंच होणार आहे यात शंका नाही. हा प्रकार सरपंच, उपसरपंच पदासाठीच केला असावा.” असं शिवाजी अस्वले म्हणाले आहेत.