धक्कादायक..! भोसरीतील '' त्या '' मुलींवर पित्याकडूनच अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 10:59 IST2019-07-30T10:58:56+5:302019-07-30T10:59:45+5:30
पोटच्या तीन मुलांना गळफास लावून आईने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला...

धक्कादायक..! भोसरीतील '' त्या '' मुलींवर पित्याकडूनच अत्याचार
पिंपरी : पोटच्या तीन मुलांना गळफास लावून आईने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला. त्यातील दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन अहवालातून ही बाब निष्पन्न झाली.प्रथमदर्शनी पुराव्यांवरून संशय आल्याने पोलिसांनी चौकशीसाठी पित्यास ताब्यात घेतले आहे़ त्याची चौकशी करून वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब चार दिवसांपूर्वी कामाच्या शोधात भोसरी येथे आले. तीनही मुलांना एका शाळेत प्रवेश घेण्यात आला. रविवारी मुलांच्या आईने घरातील छताच्या हुकाला तिन्ही मुलांना नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावला. त्यानंतर तीने दुसऱ्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नऊ व सात वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली तसेच सहा वर्षांच्या मुलाला गळफास लावल्याने त्यांचा मृत्यू झाला. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आईसह तिन्ही मुलांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर प्रथमदर्शनी पुराव्यावरून संशय आल्याने पोलिसांनी पित्याची चौकशी सुरू केली.