बंगळुरूच्या कुटुंबाचा बिहारमध्ये धक्कादायक शेवट; धर्मशाळेत सापडले चौघांचे मृतदेह; नेपाळमार्गे आलेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:25 IST2026-02-06T14:15:07+5:302026-02-06T14:25:44+5:30
बिहारमध्ये एका दिगंबर धर्मशाळेत चारजणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

बंगळुरूच्या कुटुंबाचा बिहारमध्ये धक्कादायक शेवट; धर्मशाळेत सापडले चौघांचे मृतदेह; नेपाळमार्गे आलेले
Rajgir Digambar Dharamshala: बिहारमधील आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या राजगीरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. राजगीर येथील प्रसिद्ध दिगंबर धर्मशाळेतील एका बंद खोलीत चार जैन पर्यटकांचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून, हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.
दुर्गंधी आल्यानंतर प्रकार उघड
मिळालेल्या माहितीनुसार, हे पर्यटक ३१ जानेवारी रोजी राजगीरमध्ये दर्शनासाठी आले होते. त्यांनी धर्मशाळेत एक खोली भाड्याने घेतली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या खोलीतून कोणतीही हालचाल होत नव्हती. शुक्रवारी सकाळी खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने धर्मशाळेतील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, चौघांचेही मृतदेह आढळून आले.
बंगळुरूचे रहिवासी, नेपाळमार्गे प्रवास
धर्मशाळेचे प्रभारी मुकेश जैन यांनी सांगितले की, हे चौघे ३१ जानेवारीला आले होते. त्यांनी आपण नेपाळ फिरून राजगीरला आल्याचे सांगितले होते. नोंदणी करताना केवळ एका व्यक्तीने आधार कार्ड दिले होते. त्यावर जी.आर. नाग प्रसाद असे नाव असून पत्ता बंगळुरू येथील आहे. पोलिसांनी धर्मशाळेचा रजिस्टर आणि मृतांचे ओळखपत्र जप्त केले आहे.
सामूहिक आत्महत्येचा संशय
काही माध्यमांच्या वृत्तानुसार, या चौघांनीही खोलीत गळफास लावून सामूहिक आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खोली आतून बंद होती, त्यामुळे प्राथमिक स्तरावर हा आत्महत्येचा प्रकार वाटत असला तरी, पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. हत्येचा अँगलही नाकारता येत नसल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त
घटनेचे गांभीर्य ओळखून राजगीरचे डीएसपी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. खोली पूर्णपणे सील करण्यात आली आहे. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लेबोरेटरी आणि टेक्निकल टीमला पाचारण करण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. राजगीरमध्ये अशा प्रकारे चार लोकांचे मृतदेह आढळल्याने पर्यटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या धर्मशाळेतील कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत.