धक्कादायक! देशात २०२३ मध्ये हुंड्याच्या गुन्ह्यांमध्ये १४ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:47 IST2025-10-03T12:47:35+5:302025-10-03T12:47:57+5:30
हुंड्यासाठी महिलांचा छळ होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आहे.

धक्कादायक! देशात २०२३ मध्ये हुंड्याच्या गुन्ह्यांमध्ये १४ टक्के वाढ
नवी दिल्ली : हुंड्यासाठी महिलांचा छळ होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आहे. २०२३ या वर्षात हुंड्याच्या गुन्ह्यांमध्ये १४ टक्के वाढ झाली. या वर्षात देशभरात हुंड्याशी निगडित १५ हजारांहून अधिक गुन्हे नोंद झाले असून ६१०० हून अधिक महिलांची हत्या झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.
२०२३ या वर्षात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत १५,४८९ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापूर्वीच्या २०२२ व २०२१ या वर्षांत हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनुक्रमे १३,४७९ व १३,५६८ गुन्हे नोंद झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे. उत्तर प्रदेशात या कायद्यांतर्गत सर्वाधिक ७,१५१ गुन्हे नोंदवण्यात आले. त्याखालोखाल बिहारचा क्रमांक लागत असून, ३ हजार ६६५ गुन्हे नोंदवण्यात आले.
उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक हुंडाबळीची नाेंद
एनसीआरबीच्या अहवालानुसार उत्तर प्रदेशात २,१२२, तर बिहार राज्यात १,१४३ महिलांची हत्या झाली. मात्र, या वर्षात देशभरातील ८३३ खून प्रकरणांत हुंडाबळी हे कारण नमूद केले आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत २०२३ मध्ये ८३,३२७ खटल्यांवर सुनावणी झाली. या कायद्यांतर्गत २७,१५४ लोकांना अटक झाली होती. त्यांत २२,३२७ पुरुष व ४८३८ महिलांचा समावेश आहे.