धक्कादायक! लग्नाचं वचन देऊन डॉक्टरनं फिरवली पाठ; महिला डॉक्टरने टोचलं विषारी इंजेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:57 IST2026-01-06T11:53:52+5:302026-01-06T11:57:03+5:30
मृत तरुणी ही सिद्धिपेट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 'हाउस सर्जन' म्हणून कार्यरत होती.

धक्कादायक! लग्नाचं वचन देऊन डॉक्टरनं फिरवली पाठ; महिला डॉक्टरने टोचलं विषारी इंजेक्शन
एका बाजूला डॉक्टर म्हणून रुग्णांचे प्राण वाचवण्याचे स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला आयुष्याच्या जोडीदाराकडून मिळालेली फसवणूक... या संघर्षात अखेर एका तरुण महिला डॉक्टरने मृत्यूला कवटाळले आहे. तेलंगणाच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधील २३ वर्षीय दलित महिला सर्जनने सीनियर डॉक्टरच्या लग्नास नकाराला कंटाळून विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जातीचे कारण पुढे करत लग्नाला नकार
मृत तरुणी ही सिद्धिपेट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 'हाउस सर्जन' म्हणून कार्यरत होती. तिचे त्याच कॉलेजमधील एका सीनियर रेजिडेंट डॉक्टरशी प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्नाचे वचनही दिले होते. मात्र, पीडित तरुणी दलित असल्याने आरोपी डॉक्टरने जातीचे कारण पुढे करत लग्नास स्पष्ट नकार दिला. "मी तुझ्याशी लग्न करणार नाही," असे त्याने ठणकावून सांगितल्याने तरुणी पूर्णपणे खचली होती.
हॉस्टेलमध्येच संपवले जीवन
३ जानेवारी रोजी या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले. तिने स्वतःला हर्बीसाइडचे इंजेक्शन टोचून घेतले. काही वेळातच ती बेशुद्ध पडली. हॉस्टेलमधील मैत्रिणींनी तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात आणि त्यानंतर हैदराबादमधील मोठ्या रुग्णालयात हलवले. मात्र, मृत्यूशी झुंज देत असताना ४ जानेवारी रोजी पहाटे तिचा दुर्दैवी अंत झाला.
मजूर पालकांच्या लेकीची जिद्दीची झेप अपूर्ण
मृत तरुणी ही जोगुलांबा-गडवाल जिल्ह्यातील एका अत्यंत गरीब कुटुंबातील होती. तिचे आई-वडील दिहाडी मजूर म्हणून काम करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून तिने २०२० मध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवला होता. ती अभ्यासातच नाही तर खेळांमध्येही तितकीच निपुण होती. आपली धाकटी बहीण डॉक्टर होणार या आशेवर असलेल्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आरोपी डॉक्टरला बेड्या
मृत तरुणीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सीनियर डॉक्टरविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.